ती व्हेज बिर्याणी ठरली शेवटचीच..

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये तब्बल तीन ते चार तास त्यांनी मोठ्या जल्लोषात ढोल बडवले. त्यानंतर व्हेज बिर्याणीवर ताव मारला. बिर्याणी चांगली झाली बरं का..! असे म्हणत त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आभारही मानले. दरम्यान, रात्री अडीचच्या सुमारास थकलेल्या शरीराने घरी जात असताना काळाने त्यांच्यावर झडप मारली. त्यामुळे पिंपळे गुरव येथील व्हेज बिर्याणी शेवटची ठरल्याचे बोलले जात आहे. गोरेगाव, मुंबई येथून पिंपळे गुरव येथे आलेल्या ढोलताशा पथकाच्या बसचा जुन्या महामार्गावर बोरघाट येथे अपघात होऊन बारा जणांचा मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (दि.14) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपळे गुरव येथील अखिल सुदर्शन नगर मित्रमंडळाने देखील जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीसाठी गोरेगाव, मुंबई येथील बाजीप्रभू ढोल ताशा पथकाचे तरुण शहरात आले होते. मिरवणुकीत तब्बल तीन ते चार तास पथकातील तरुणांनी मोठ्या उत्साहात खेळाचे प्रदर्शन केले. ढोल ताशा वादन करीत असताना त्यांचा जोश पाहून मिरवणुकीत सहभागी झालेले सर्वजण आपोआपच थिरकू लागले. मात्र, पुढील काही तासातच काळाने त्यांच्यासमोर आणखी काय वाढून ठेवले, याची पुसटशी कल्पना देखील कोणालाच नव्हती.

मिरवणूक संपल्यानंतर मंडळांनी सर्वांसाठी व्हेज बिर्याणीची व्यवस्था केली होती. त्यानुसार, पथकातील दमलेल्या सर्व सदस्यांनी मोठ्या आवडीने बिर्याणी खाल्ली. त्यानंतर गप्पा मारून पथकातील सदस्य रात्री अडीचच्या सुमारास बसमध्ये बसले. प्रवासादरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाट येथे त्यांच्या बसचा अपघात झाला. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. तर, 29 जण जखमी झाले आहेत.

Exit mobile version