… म्हणून नाही स्वीकारला भरत गोगावलेंनी पदभार

कार्यकर्त्यांना धागधूग, नागरिकांमध्ये चर्चांना उधाण

। रायगड । खास प्रतिनिधी ।

राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाला होता. खातेवाटप झाल्यानंतरही अद्यापही काही मंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्विकारलेला नाही. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील रोजगार हमी योजना फलोत्पादन मंत्री आ. भरत गोगावले यांचाही समावेश आहे. परिणामी, गोगावलेंच्या कार्यकर्त्यांची धागधूग वाढली असून आता नवा ट्विस्ट आला तर पुन्हा टीकेला सामोरे जावे लागेल, अशी भिती त्यांच्यामध्ये असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गेली काही दिवस काही मंत्री सुट्ट्यांचा आनंद उपभोगत आहेत. काही परदेशवारीला गेले असल्याने पदभार स्विकारण्यास विलंब होत असल्याचे बोलले जाते. याबाबत रोजगार हमी मंत्री आमदार भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 2 किंवा 3 जानेवारी रोजी कॅबीनेटची बैठक होईल. त्यानंतर मंत्री आपापल्या खात्याचा पदभार स्विकारतील, असे सुतोवाच केले. रायगड जिल्ह्याचा मीच पालकमंत्री होणार याचा देखील त्यांनी पुनरुच्चार केला. विविध मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार न घेतल्याने राज्यातील जनतेचा विकास वार्‍यावरच असल्याचे दिसून येते.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) पालकमंत्रिपदावरून वाद सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. यावरून काही जिल्ह्यामध्ये संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पकड प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रिपद हवे आहे. रायगड जिल्ह्यातदेखील पालकमंत्री पदावरुन आमदार भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांच्यामध्ये चढाओढ सुरु आहे.

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले. मात्र, आता खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालने देण्यात आली असली, तरी अजूनही 18 मंत्र्यांनी पदाची सूत्रे हाती घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे मंत्री नाराज आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री दत्तात्रय भरणे हे परदेशवारीला गेले आहेत. नाराज असल्यानेच भरणे यांच्याकडून पदभार स्वीकारण्यास विलंब करण्यात येत आहे, अशी चर्चा होत आहे. अशीच चर्चा अन्य काही मंत्र्याबाबतही होत आहे. पदभार न स्वीकारलेले मंत्री आशिष शेलार, अतुल सावे, नरहरी झिरवाळ, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, दादा भुसे, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील, योगेश कदम, पंकज भोयर, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर यांचा समावेश आहे.

Exit mobile version