त्याने गुढी उभारली अन्‌‍ क्षणात होत्याचं नव्हतं झालं

| रसायनी | राकेश खराडे |

संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवारी (दि.9) मोठ्या उत्साहात गुढीपाडवा सण साजरा केला. सर्वत्र जल्लोष होता. मात्र रसायनी येथील राणे कुटूंबियांवर सणासुदीच्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला. नववर्षाची गुढी उभी करताना शॉक लागून रवींद्र जगन्नाथ राणे या 42 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

चौक मोरबे धरणग्रस्त पुनर्वसन वसाहत असलेल्या मोरबे या गावात रवींद्र जगन्नाथ राणे हे आपल्या घरासमोरील अंगणात गुढी उभारत होते. त्यांच्या घरावरून हाय टेन्शन वीज प्रवाह असलेली लाईन गेली आहे. गेली कित्येक वर्ष रवींद्र राणे व इतर बाधित ग्रामस्थ हाय टेन्शन वीज प्रवाह असलेली लाईन काढून टाकण्यासाठी विद्युत मंडळाकडे अर्ज विनंती करीत आहेत. पण विद्युत मंडळाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मराठी नविन वर्षाच्या प्रारंभी घडलेल्या घटनेने मोरबे धरणग्रस्त ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. चौक येथील उपअभियंता बोधनकर यांच्याशी संपर्क साधला असता घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगून याबाबत वरिष्ठांना कळविले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर येणार असुन जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येईल. मयताच्या वारसांना मदत मिळण्यासाठी लागणारी आवश्यक मदत आम्ही करू, असेही त्यांनी सांगितले. रवींद्र राणे यांच्या पश्चात दोन लहान मुले, पत्नी, आई असा परिवार आहे. परिणामी, घरचा कमवता गेल्याने योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Exit mobile version