अंबेच्या काठी लालबावट्याचा हुंकार

शेकाप मेळाव्याची जोरदार तयारी
| अलिबाग | प्रतिनिधी |
गेली साडेसात दशके रायगडच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार चळवळीत आघाडीची भूमिका स्वीकारत गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज बनलेल्या, पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा 76 वा वर्धापनदिन पालीत बुधवारी (दि.2) स्व. नामदेवशेठ खैरे नगरीत साजरा होत आहे.

यानिमित्ताने अंबेच्या काठावर लालबावट्याचा झंझावात निर्माण होणार आहे.या मेळाव्याची जोरदार तयारी शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा चिटणीस ॲड.आस्वाद पाटील, शेकाप नेते सुरेश खैरे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

वर्धापनदिनाच्या पाश्वभूमीवर महिन्याभरापासून तालुकास्तरावर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. तालुका स्तरावरील पदाधिकारी गावोगावी, खेड्यापाड्यात जाऊन कार्यकर्त्यांना भेटले. महिला,तरुण वर्गांसह ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीदेखील या बैठकांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते, तरुण, तरुणी, महिलांनी वर्धापनदिनाला येण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती
शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन पाली येथे साजरा केला जाणार आहे. या वर्धापन दिनाची तयारी गेल्या महिन्याभरापासून जोरात सुरु आहे. मंडपापासून पार्कींग व्यवस्था, आसन व्यवस्था अशी सर्वच तयारी करण्यात आली आहे. शेकापच्या वर्धापन दिनामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला आहे. त्युाळे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्यात सामिल होणार असल्याची माहिती शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांनी दिली.

वर्धापनदिनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना एक वेगळी उर्जा मिळणार आहे. त्यामुळे हजारो कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

ॲड. आस्वाद पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस

Exit mobile version