| स्व. नामदेवशेठ खैरे नगरी(पाली) | प्रतिनिधी |
पाली नगरीत बुधवारी (2 ऑगस्ट) शेतकरी कामगार पक्षाचा 76 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. या मेळाव्याची तयारी जोरदार करण्यात आली असून, मान्यवरांसह सुमारे 20 हजारांहून अधिक कार्यकर्ते या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे शेकाप नेते सुरेश खैरे यांनी सांगितले.
गेली साडेसात दशके रायगडसह राज्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, महिला क्षेत्रात शेतकरी कामगार पक्षाने अढळ स्थान मिळविलेले आहे. दरवर्षी रायगडात शेकापचा वर्धापनदिन धुमधडाक्यात साजरा केला जातो. भर पावसात रायगडच्या कानाकोपऱ्यातून लालबावट्याशी निष्ठा असणारे हजारो कार्यकर्ते लालबावटे की जय असा जयघोष करीत ढोल,ताशांच्या गजरात मेळाव्याला येतात. हा प्रघात गेली 75 वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. पक्षात आतापर्यंत अनेक चढउतार आले. सत्ता आली, गेलीही पण त्याची फिकीर न करता केवळ आणि केवळ पक्षाशी असलेली निष्ठा व्यक्त करण्यासाठी येतात. यावेळीही त्याची प्रचिती येणार आहे.
शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या वर्धापनदिन सोहळ्यास यावेळी कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांना विचारांची मोठी शिदोरी मिळणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी जिल्हा चिटणीस ॲड.आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाली विभागाचे नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत गेले पंधरा दिवस सुरु करण्यात आली आहे. यासाठी मोठा शामियाना उभारण्यात आला आहे. पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी वॉटरप्रुफ असा शामियाना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मान्यवर तसेच कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी वाकण फाट्यापासून थेट मेळाव्यापर्यंत मोठमोठ्या कमानी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र लालबावटे डौलाने फडकू लागलेले आहेत.
शाहिरांची पडणार डफावर थाप
दुपारी दोन वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पोवाड्यासह शाहिरांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे. त्यानंतर मशाल पेटवली जाणार आहे. मान्यवरांचे स्वागत केले जाणार आहे.वर्धापनदिनानमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पक्षाचे अहवाल वाचन केले जाणार आहे. त्यानंतर आ. जयंत पाटील, युवराज संभाजी महाराज यांचे विचार ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. पक्षाचे ध्येय धोरणे, बदलते राजकारण इत्यादी विषयांवर कार्यकर्त्यांना या अधिवेशनातून दिशा दिली जाणार असल्याची माहिती सुरेश खैरे यांनी दिली.