चरीचा संप शेतकऱ्यांना प्रेरणादायी

ज्येष्ठ साहित्यिक कैलास पिंगळे यांचे प्रतिपादन

| भाकरवड | वार्ताहर |

चरीच्या अभूतपूर्व संपाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि स्व.नारायण नागु पाटील यांच्या प्रभावशाली नेतृत्व लाभले होते. संपातील लढवय्या शेतकऱ्यांच्या संघर्षाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आहोत आपण कसत असलेल्या जमिनीची मालकी त्यावेळी खोत सावकाराकडे होती. आपले पूर्वज केवळ वेठबिगार म्हणून राबत होते.त्या शोषणाविरुद्ध सात वर्षे शेतकऱ्यांनी सावकारांच्या जमिनी ओसाड टाकल्या. त्या संपामुळे कुळ कायदा अस्तित्वात आला आणि स्वातंत्र्यानंतर आपण जमिनीचे मालक झालो.असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक कैलास पिंगळे यांनी केले.

अलिबाग तालुक्यातील चरी येथे शेतकरी संपाचा 90 वा वर्धापनदिन सोहळा सोमवार 27 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सरपंच नीलम पाटील, उपसरपंच अभय पाटील, माजी सभापती प्रमोद ठाकूर, माजी सरपंच विजय ठाकूर, माजी सभापती प्रकाश पाटील, सुधाकर पाटील उरण, कैलास पिंगळे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र ठाकूर, रोहित जाधव, तेजश्री ठाकूर, शुभांगी पाटील, अध्यक्ष कोपर पाडा उमाकांत पाटील, अध्यक्ष चरी प्रमोद भगत, अध्यक्ष कोपर जगदीश थळे, सुरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

भाई अनंत चित्रे आणि सुरबा नाना टिपणीस यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या आंदोलनात महत्त्वाचे योगदान आहे. 1933 ते 1939 या सात वर्षांच्या काळातील हा रोमहर्षक लढा शेतकऱ्यांना सावकारी पाशातून सोडविणारा ठरला. चरीच्या शेतकरी 76 वर्षे पूर्ण झाली म्हणून 2009 साली लोकनेते स्व. दत्ता पाटील यांच्या नेतृत्वाने व मान्यवरांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव साजरा केला. त्यावेळी चरी शेतकऱ्यांना संपाची आठवण म्हणून चरी ग्रामपंचायत समोर स्मारक उभारण्यात आले आहे.आजही चरीच्या सत्याग्रहाचा लढा शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. असे ज्येष्ठ साहित्यिक कैलास पिंगळे म्हणाले.

रायगड जिल्ह्याच्या अलिबाग परिसरात तब्बल सात वर्षे शेतकरी संपावर गेले होते. त्या काळातील खोती पद्धतीविरोधात शेतकऱ्यांनी हा लढा दिला होता. चरी या गावी शेतकऱ्यांनी परिषद भरवून लढ्याचे रणशिंग फुंकले आणि परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद देऊन एक अभूतपूर्व आंदोलन उभे केले. परिसरातील 14 गावे यात सहभागी झाली होती. सात वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात सामान्य शेतकऱ्यांनी दाखवलेली एकजूट आणि मिळवलेला विजय अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे असे अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर म्हणाले.

यावेळी कै.ताराबाई तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ सरपंच नीलम पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली पाचवी ते दहावी बारावीपर्यंत मुला-मुलींच्या धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी महिलांना साड्या वाटत करण्यात आल्या. ग्रामपंचायत मानकुळेच्या नवनिर्वाचित सरपंच जागृती म्हात्रे, ग्रामपंचायत वाघ्रणचे सरपंच राजेंद्र पाटील यांचा सत्कार सरपंच नीलम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Exit mobile version