काही तासातच घेतला अपहरण केलेल्या मुलीचा शोध

। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागजवळील रामनाथ येथील गार्डनवर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीचे बुधवारी सायंकाळी अपहरण करण्यात आले होते.अलिबाग पोलीसांनी सीसीटीव्ही व स्थानिकांच्या मदतीने अवघ्या दीड तासातच अपहरणकर्त्याचा शोध घेऊन मुलीला सुखरुप पालकांच्या ताब्यात दिले.

मोहन दिनानाथ चव्हाण ( वय 27)मुळ रा. कर्नाटक सध्या अलिबाग असे या अपहरणकर्त्याचे नाव आहे. पाच वर्षीय मुलगी बुधवारी सायंकाळी गार्डनमध्ये खेळत होती. त्याठिकाणी कोणीही नसल्याचा फायदा घेत त्या मुलीला सात वाजण्याच्या सुमारास खाऊ देतो असे अमिष दाखवत पळवून नेले. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठले. अलिबाग पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिकांच्या व सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने अपहरणकर्त्याचा शोध सुरु केला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार रमेश सोनकर, पोलीस हवालदार सुनील फड यांनी वेगवेगळ्या माध्यमातून शोध सुरु ठेवला. अखेर पिंपळभाट येथील एका घरात मुलगी असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलीसांनी छापा टाकून मोहन चव्हाण याला ताब्यात घेऊन मुलीला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मोहन चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तो गेल्या दीड महिन्यांपासून अलिबागमध्ये नोकरी निमित्त राहत आहे. त्याला गुरुवारी अलिबाग न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version