खबरदारी घेण्याचे आवाहन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पालीतील ऐतिहासिक महत्व असलेला व अलौकिक निसर्गसौंदर्याने नटलेला सरसगड किल्ला हा गडप्रेमी, ट्रेकर्स व निसर्गप्रेमी यांना नेहमीच आकर्षित करतो. परंतु, सरसगडावर वारंवार होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे प्रशासन व ट्रेकर्सकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सुधागड तालुक्यातील पाली येथील सरसगड किल्ला पावसाळ्यात ट्रेकर्सचे आकर्षण बनत आहे. हा किल्ला अत्यंत उभ्या चढाईचा असल्याने पावसाळ्यात कोणतीही खबरदारी न घेता या किल्ल्यावर जाणे अतिशय धोकादायक बनते. पावसाळ्यात सरसगड किल्ल्यावरून आतापर्यंत अनेक ट्रेकर्स व दुर्गप्रेमी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच शनिवारी (दि. 02) सरसगडावरून एक तरुण पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. रेस्क्यू टीम, पोलीस व स्थानिकांच्या अथक परिश्रम व मेहनतीने या जखमी तरुणाला खाली आणण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. चार वर्षांपूर्वी सरसगडावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या घटना टाळण्यासाठी प्रशासनासह स्थानिक आणि प्रशिक्षित ट्रेकर्स यांनी सरसगडावर जाताना प्रत्येकाने योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पावसाळ्यात धोकादायक
सरसगड किल्ला पावसाळ्यात निसरडा होतो. सरसगड किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या या पावसाळ्यामध्ये चिकट होतात. त्यावर शेवाळ देखील चढते. त्यामुळे तेथून चढताना व उतरताना अनेक वेळा पाय घसरतो. याशिवाय सरसगडावर चढताना तीव्र उतार आहे. पावसाळ्यात तिथे गवत येते. तसेच, तेथील जागा चिकट होते. त्यामुळे तेथे देखील पाय घसरण्याचा व तोल जाण्याचा धोका आहे. किल्ल्याच्या वरच्या टप्प्यावर देखील चढताना असलेल्या छोट्या पायऱ्या चिकट होतात आणि तेथून जाताना वाट धोकादायक होते.
ऐतिहासिक महत्त्व असलेला सरसगड किल्ला हा सर्वांच्याच अस्मितेचा विषय आहे. येथील निसर्ग सौंदर्य देखील विलोभनीय आहे. मात्र, पावसाळ्यात येथे येणारे दुर्गप्रेमी, पर्यटक आणि ट्रेकर्स यांनी खूप जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. आपला जीव धोक्यात येईल अशी कोणतीही कृती करू नये. तसेच, योग्य ती पूर्वतयारी व काळजी घेऊनच किल्ल्यावर जावे.
– आरिफ मनियार, प्रभारी नगराध्यक्ष, पाली,
सरसगड किल्ल्यावर येणाऱ्यांनी आवश्यक सेफ्टी निकषांचे तंतोतंत पालन करावे. किल्ल्यावर कोणत्याही दुर्गम व धोकादायक ठिकाणी जाऊ नये. तसेच, किल्ल्यावर चढताना व उतरताना आवश्यक खबरदारी घ्यावी आणि शक्यतो पावसाळ्यात येणे टाळावे.
– हेमलता शेरेकर, पोलीस निरीक्षक, पाली






