| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल सेक्टर 1 झोपडपट्टी परिसरात शगुन बँक्वेटजवळ, रेल्वे पत्रीजवळ मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. दुपारी 12.55 वाजता मिळालेल्या माहितीवरून नवीन पनवेल अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे लक्षात येताच नवीन पनवेल केंद्राचे एमएच 46 जी 0057 हे वाहन प्रथम पोहोचले. परिस्थितीची तीव्रता पाहून एमचएच 46 डीसी 0323 तसेच ओल्ड पनवेल येथील एमएच 46 बीएम 0961 व एमएच 02 जीएच 4897 ही अतिरिक्त वाहने मदतीसाठी बोलावण्यात आली. जवानांनी पाच होजची एक लाईन व डायव्हिंग ब्रिचिंगच्या सहाय्याने दोन लाईन टाकत आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, घटनास्थळी दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला; मात्र सहा सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे विझवण्यात आली. या आगीत पाच घरे जळून खाक झाली असून, घरगुती साहित्य व पत्र्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच शेजारील शगुन बँक्वेट हॉलच्या छताचे व काही साहित्याचे किरकोळ नुकसान झाले. उपअग्निशमन अधिकारी अतुल सपकाळ व शुभम राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तपास सुरू आहे.






