| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील एका विद्यार्थिनीला धावत्या लोकलमधून ढकलून दिल्याप्रकरणी संशयिताला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
गुरुवारी (दि.18) सकाळी आठ वाजता पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी संशयिताची तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पनवेल येथे राहणारी ही विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी महिलांच्या डब्यातून प्रवास करत होती. याच वेळी या डब्यात घुसखोरी करणाऱ्या एका माथेफिरूला डब्यातील महिलांनी जाब विचारला. त्याचा राग मनात घरत आरोपीने दरवाजात उभ्या असलेल्या या पीडित विद्यार्थिनीला थेट धावत्या लोकलमधून बाहेर ढकलले.
आरडाओरड करत प्रवाशांनी तात्काळ आपत्कालीन साखळी ओढली. प्रवाशांच्या मदतीने जखमी विद्यार्थिनीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याने तिला घरी सोडण्यात आले आहे. तिच्या डोके, कंबर आणि हातापायांना दुखापत झाली होती. दरम्यान, माहिती मिळताच जीआरपी पोलिसांनी खांदेश्वर रेल्वे स्थानकात सापळा रचून संशयित आरोपी शेख अख्तर नवाज शेख (50) याला अटक केली. तो मूळचा मुंबईतील खार रोड परिसरातील असून, कायमस्वरूपी फिरस्ता असल्याचे तपासात उघड झाले.







