चोरीतील फिर्यादीच निघाला आरोपी

खांदेश्‍वर पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल
। पनवेल । वार्ताहर ।

जबरी चोरी संदर्भात फिर्याद देणारा इसमच आरोपी निघाला असून या गुन्ह्याची उकल तांत्रिक तपासाद्वारे व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केल्याने खांदेश्‍वर पोलिसांचे कौतुक होत आहे. तक्रारदार उमेश दगडू कदम रा. गुजरात वापी हे त्यांच्या मालकीचा आयशर ट्रकमध्ये माल घेवून पुणे-मुंबई अशी वाहतुक करीत असताना एक्सप्रेस वे संपण्यापूर्वी दोन इसमांनी ट्रकला हात दाखवून, ते गाईड असल्याचे सांगून ट्रकमध्ये बसले व साकेत ब्रीज येथे आल्यावेळी उमेश कदम यांना चाकूचा धाक दाखवून ट्रकमधून खाली उतरवून मालासह ट्रक जबरी चोरी करून घेवून गेलेबाबत तक्रारदार यांनी कापूरबावडी पोलीस स्टेशन जि. ठाणे येथे तक्रार दिली होती. त्यानुसार खांदेश्‍वर पोलिसांनी कळंबोली एक्सप्रेस वे पासून ते साकेत ब्रीज ठाणे दरम्यानच्या रोडवरील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली परंतु त्यामध्ये ट्रक जाताना दिसून आला नाही. त्यामुळे शंका निर्माण झाल्याने पोलिसांनी फिर्यादीकडे केलेल्या तपासात व तांत्रिक तपासाच्या आधारे सदरचा गुन्हा तक्रार देणारे ट्रक चालक यांनी केला असल्याचे व गुन्हा घडल्याचा बनाव करून खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास स.पो.नि. समीर चासकर करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परि 2 पनवेल शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग भागवत सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. समीर चासकर, पो.ना. भाऊराव बाचकर, पो. ना. चेतन घोरपडे, पो.ना. अमित पाटील यांनी केली.

Exit mobile version