| खोपोली | प्रतिनिधी |
देवन्हावे गावात एका खोलीत राहणाऱ्या मित्राने मित्राचाच खून करून पसार झाल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. फरार आरोपीला पकडण्यासाठी खोपोली पोलिसांनी चंग बांधून सुरत-अहमदाबाद असा पाठलाग करीत आरोपीला अखेर भारत नेपाळ सीमेवर अटक केले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हयातील मयत पारस सिंग याने आरोपीकडे हातउसने दिलेले 6 हजार रुपये परत मागितले म्हणून आरोपीने राग धरत डोक्यात दगडाने मारुन, गंभीर दुखापती करुन त्यास जीवे ठार मारले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. खोपोली पोलिसांनी दबंग कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथील सुशांत चौधरी यांच्या भाड्याचच्या खोलीत आरोपी अख्तर हबीब बैठा (रा.वॉर्ड नं.3, गांव-पिरोखर, जि. मधुबनी, राज्य-बिहार) त्याचा मित्र मयत नामे पारस हरिहर सिंग (50 ), रा.वॉर्ड नं. 3, खैरवा, पो. मणियारी, तहसील-डुमरा, जि.सितामढी, बिहार) यांच्यासोबत राहत होता. दोघांमध्ये अज्ञात कारणावरुन वाद झाला आणि आरोपीने पारस सिंग यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच त्याच्यावर औषधोपचार न करता जखमी अवस्थेत तेथेच सोडुन पळून गेला. या घटनेत मयताचा मृत्यु झाला. ही घटना 11 सप्टेंबर रोजी घडली होती.
रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल पाटील, पोलीस निरिक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या नेतृत्वाखाली पोहवा संदिप चव्हाण, पोशि प्रणित कळमकर, परसराम टेकाळे, किरण देवकाते, समीर पवार अशी टिम नेमण्यात आली.
आरोपी गुन्हा केल्यानंतर प्रथम ठाणे येथे गेल्याचे समजले होते व त्यानंतर त्याने डहाणू, जि. पालघर येथे गेल्यावर फोन बंद केला होता. तसेच त्याच्या संपर्कातील व्यक्ती/नातेवाईक यांचे ही फोन बंद झाले होते. त्यामुळे आरोपीच्या पुढील ठावठिकाणाबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा शोधून काढण्याचे आव्हान तपास पथकापुढे निर्माण झाले होते. त्यानंतर सुरत व अहमदाबाद येथे कामानिमीत्त वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे आरोपीत याचा शोध घेण्याकामी तपास पथक ठाणे, सुरत व अहमदाबाद येथे पाठविण्यात आले होते. परंतु आरोपीत सापडला नाही. गुन्ह्याचे तपासिक अधिकारी सुजित गडदे यांनी तपास पथकासह आरोपीत याच्या मुळ गावी, जि. मधुबनी, तसेच त्याचे सासरवाडी जि.सितामढी, राज्य-बिहार येथे गेले होते. तेथे गेल्यावर आरोपीच्या नातेवाईकांकडे तपास केला असता काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही. अखेर कौशल्याचा वापर करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तपासाची चक्रे फिरवुन स्थानिक गोपनीय बातमीदार निर्माण केले. त्यांच्या मदतीने आरोपी एकदराबेला, महोत्तरी, नेपाळ येथे असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त केली. त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी यांनी आरोपीच्या मानसिकतेचा अभ्यास करुन त्याच्यासोबत थेट संपर्क होत नसतानाही तो नातेवाईकांना भेटण्यासाठी भारत-नेपाळ सीमाभागात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस पथकाने अत्यंत कौशल्याने आरोपीचा माग काढून, स्थानिक पोलीसांची मदत घेवून त्यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.







