विवाह नोंदणी ॲपवरुन त्याने केली तब्बल इतकी लग्न; पोलिसांना समजताच…

| रसायनी | राकेश खराडे |
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाच महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शांतीलाल यशवंत खरात (वय 51, रा. ग्लोरी हौसिंग सोसायटी, गोकुळ टाऊनशिप) हा रियल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असून त्याने लग्नाच्या वेबसाईटवर नोंदणी केली होती. या ॲपद्वारे फिर्यादी महिलेस या लग्नासाठी मागणी घातली. फिर्यादी व आरोपी यांची बोलणी सुरु असताना आरोपी हा विधूर असून त्याला दोन मुली आहेत त्यांच्यासाठी जीवनसाथी पाहिजे, असे सांगून त्याने इतर माहिती लपवून व फिर्यादी महिलेस विश्वासात घेऊन यश मंगल कार्यालय, रिस येथे दोघांनी लग्न केले.

लग्नानंतर फिर्यादी महिला व आरोपी पती-पत्नी म्हणून रिस येथे राहत होते. चार-पाच महिन्यानंतर आरोपी फिर्यादी महिलेस शारिरिक त्रास व शिवीगाळ, छळ करून आर्थिक खर्चासाठी व व्यवसायासाठी पैसे मागू लागला. फिर्यादी महिलेने आपले लग्न मोडू नये, म्हणून भावाकडून व स्वतःकडील कमीत कमी 7 लाख 55 हजार रूपये आरोपी शांतीलाल यशवंत खरात यास दिले. शिवाय फिर्यादी महिला माहेरी गेली असताना तिला न सांगता तिच्या गैरहजेरीत तिचे दागिने मुथ्थ्युट फायनान्स येथे गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतले.

याबाबत फिर्यादीने रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुवर्णा खाडये यांनी विशेष तपास चक्र फिरवले. यावेळी आरोपी शांतीलाल यशवंत खरात याची यापुर्वीच पाच लग्न झाली असल्याचे समोर आले. तसेच त्याला दोन मुली आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला असून मृत्यूचा दाखला पोलिसांनी प्राप्त केला आहे. दुसरी पत्नीचीही आरोपीने फसवणूक केली असून त्याबाबत घटस्फोटाचा खटला बांद्रा कोर्टामध्ये चालू आहे. तिसरी पत्नी हिच्याशी 2015 रोजी मंदिरात जाऊन लग्न केले आहे. ज्या मंदिरात लग्न केले आहे .त्या मंदिराच्या रजिस्टरमध्ये आरोपी व त्याच्या तिसऱ्या पत्नीची नोंद असून त्यावेळी पैसे भरल्याची पावती व मंदिराच्या पुजाराने लग्न लावल्याचे सर्टिफिकेट व कागदपत्र प्राप्त झाले आहेत. चौथी पत्नी हिच्याशी सुध्दा सेतु कार्यालयात नोंद असून मंदिरात जावून लग्न केले आहे.

पाचवे लग्न झालेले असून सुध्दा आरोपी सध्या ज्या कंपनीमध्ये काम करतो तेथील महिलेशी त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत. यामध्ये रसायनी पोलीस ठाण्यात आरोपी विरूध्द तक्रार दाखल झाली असून आरोपी शांतीलाल यशवंत खरात याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पोलीस ठाण्यात हजर झाला. परंतु तपासकामी काही सहकार्य केले नाही. सध्या आरोपी रिमांडमध्ये असून रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुवर्णा खाडये अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version