सोने चोरणार्‍या आरोपींना अटक

। पालघर । प्रतिनिधी ।

भाईंदर पश्‍चिमेला एका ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून सोने हिसकावून रिक्षाने पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एकाला जळगाव येथून व दुसर्‍याला ठाणे येथून अटक करत चोरी केलेल्या सोन्यापैकी 301 ग्राम मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुनिल पाटील आणि त्याचा साथीदार रामानंद छोटेलाल यादव अशी आरोपींची नावे आहेत.

नालासोपारा येथे राहणारे बाळकृष्ण अबगुल (61)हे त्यांच्या बॅगेमधून अंदाजे 25 लाख रुपये किंमतीचे 375 ग्रॅम सोन्याची लगड, सोन्याचे तुकडे आणि बिस्किट घेऊन जात असताना दोन अनोळखी व्यक्ती तेथे आले होते. दोघांनी काका काल तर जास्त चॉकलेट देत होते. आज नाही आहे का चॉकलेट? असे बोलून त्यांनी जबरदस्तीने बॅग हिसकावून घेत तेथून पळ काढला होता. त्यानंतर याबाबत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे व कर्मचारी यांनी परिसरातील अधिक सीसीटीव्ही तपासणी केली. तसेच, आरोपींचे मोबाईल नंबर मिळवले. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

Exit mobile version