| तळा | वार्ताहर |
फळ पीक विमा रक्कम न मिळाल्याने तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत. 29 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली होती. तहसीलदार स्वाती पाटील, कृषी अधिकारी आनंद कांबळे यांच्या मध्यस्थीने भारतीय कृषी विमा कंपनीचे रायगड जिल्हा प्रतिनिधी शरद कबारे यांनी 15 दिवसांत पैसे जमा होतील, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाला आज 22 दिवस होऊन गेले, तरी शेतकऱ्यांचे पैसे अजून जमा झालेले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर पुन्हा साखळी उपोषण सुरू केले आहे.
दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या या तालुक्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. परंतु, अवकाळी पाऊस, वन्य प्राणी यामुळे शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आंबा, काजू या पिकांकडे वळला असताना, विमा कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, मग शेतकऱ्याने करायचं काय? उत्पन्नाचे कुठलेच साधन नसल्याने शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी शेतकऱ्यांनी तहसील प्रांगणात साखळी उपोषणाला सुरुवात केली असून, जोपर्यंत फळ पीक विमा परतावा मिळत नाही, तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. फळ पीक विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित असून, संबंधित विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे. त्यामुळे न्यायाच्या मागणीसाठी बळिराजा उपोषणास बसला आहे. संबंधित अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी, महसूल व कृषी विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.






