| पनवेल | प्रतिनिधी |
महापालिकेची निवडणूक भयमुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे यांनी दिले. निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
कैलास पगारे यांनी सांगितले, की पनवेल महापालिकेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला असून, तयारी योग्य दिशेने सुरू आहे; मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी सर्व तयारीची पुन्हा एकदा काटेकोरपणे पडताळणी करावी. पोलीस विभागामार्फत स्थिर पथके, भरारी पथके व विशेष पथकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. मतदानाच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रांवर तैनात करावयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांबाबत, तसेच आवश्यक बंदोबस्ताबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत विविध गुन्ह्यांमध्ये सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच रात्रीची गस्त, बस व रेल्वेची तपासणी नियमितपणे सुरू असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला निवडणूक निरीक्षक मनीषा कुंभार, निवडणूक अधिकारी मंगेश चितळे, आयकर विभागाचे डॉ. अमित मुंडे, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, तिरुपती काकडे, गणेश शेटे व महेशकुमार मेघमाळे, कैलास गावडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भयमुक्त निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606