निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

आठवडाभरात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सज्ज आहे. मतदार यादी, मतदान केंद्र यांची माहिती घेण्यात आली आहे. सतरा लाख 381 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पनवेल महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे 61 सदस्य होते. परंतु, महानगर पालिका स्थापनेनंतर दोन सदस्य कमी झाले. त्यामुळे 59 जागांसाठी मागील कालावधीत निवडणूक झाली. रायगड जिल्हा परिषदेवर यापूर्वी शेतकरी कामगार पक्ष 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 11, काँग्रेस व भाजप प्रत्येकी तीन असे बलाबल होते. रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य पदांचा कार्यकाल 22 मार्च 2022 ला संपला. तेव्हापासून रायगड जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरु आहे. प्रशासनाद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा कारभार चालविला जात आहे. सध्या प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले काम पाहात आहेत. प्रशासनामार्फतच आजपर्यंत जिल्हा परिषदेचा कारभार सुरु आहे. तीन वर्षे नऊ महिने अकरा दिवस होऊन देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर गेल्याने जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकीय राजवटीनुसार चालत आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी लोकसंख्या वाढ विचारात घेऊन प्रभाग रचना करण्यास सांगितले होते. परंतु, 2021 मध्ये जनगणना न झाल्याने ती प्रभाग रचना रद्द करून 2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार प्रभाग रचनेचा कार्यक्रम पार पडला. प्रभाग रचनेनंतर आरक्षण जाहीर कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर रायगड जिल्ह्यातील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती अध्यक्ष व सदस्यपदांचे आरक्षणही जाहीर झाले. मात्र, आजही जिल्हा परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत, असे चित्र आहेे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका शासन कधी घेणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे डोळे लागून राहिले होते. अखेर ही उत्कंठा आता संपण्याच्या मार्गावर आहे. पावणेचार वर्षांनंतर रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कामाला लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या 59, तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. आता निवडणुका जाहीर होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आरक्षण, मतदान यादी, मतदार केंद्र सर्व निश्चित झाले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 17 लाख 381 मतदार आहेत. त्यात आठ लाख 57 हजार नऊ महिला आणि आठ लाख 46 हजार 347 पुरुष मतदार, तसेच इतर 25 मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात दोन हजार 323 मतदान केंद्रे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. राज्य निवडणूक आयोग लवकरात लवकर या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आठ जानेवारीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.

जि.प., पं. स. मतदार संख्येवर दृष्टीक्षेप

तालुके जि.प.गटपं. स. गण मतदार केंद्र
पनवेल 8162,79,776346
कर्जत 6121,70,702220
खालापूर481,10,982144
सुधागड2453,99875
पेण 5101,39,479 190
उरण –481,08,520 135
अलिबाग 7142,01,923 261
मुरुड 2455,552 81
रोहा481,28,763 194
तळा – 2432,122 52
माणगाव – 481,39,519 206
म्हसळा – 2443,531 69
श्रीवर्धन – 2456,826 80
महाड – 5101,39446 203
पोलादपूर – 2439,242 67
एकूण –5911817,00,381 2323
Exit mobile version