उमेदवारांचे भवितव्य महिलांच्या हाती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून, प्रशासकीय यंत्रणा आता कामाला लागली आहे. जिल्हा परिषदेच्या अलिबाग तालुक्यातील 7 आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यावेळी 2 लाख 1 हजार 923 मतदार मतदानाचा हक्क दि.5 फेब्रुवारीला बजावणार आहेत. त्यामध्ये 1 लाख 3 हजार 117 महिला मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे अगामी निवडणूकीत अलिबागमध्ये उमेदवारांचे भवितव्य महिलांच्या हाती असणार असल्याची माहिती समोर येत आहे.
फेब्रुवारी महिन्यात रायगड जिल्हा परिषदेच्या 59 व पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यातील अलिबाग तालुक्यामध्ये शहापूर, आंबेपूर, आवास, थळ, चेंढरे, चौल व कावीर असे 7 जिल्हा परिषद गट आणि वैजाळी, शहापूर, आंबेपूर, रुईशेत भोमोली, आवास, किहीम, थळ, वरसोली, चेंढरे, आक्षी, रेवदंडा, चौल, काविर, रामराज असे 14 पंचायत समिती गण आहेत. जिल्हा परिषद गटातील शहापूर, आवास, चौल या ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण आहे. आंबेपूर, थळ येथे सर्वसाधारण महिला, कावीर येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग व चेंढरे येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षण आहे. तसेच, अलिबाग पंचायत समिती गणातील वैजाळी, शहापूर, आंबेपूर, आक्षी, कावीर येथे सर्वसाधारण आरक्षण आहे. किहीम, चेंढरे, चौल, रामराज येथे सर्वसाधारण महिला, रेवदंडा येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग, वरसोली व आवास येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, रुईशेत भोमोली येथे अनुसूचित जमाती व थळ येथे अनुसूचित जमाती महिला आरक्षण आहे. यावेळी जिल्हा परिषद 7 व पंचायत समितीच्या 14 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत एकूण 2 लाख 1 हजार 923 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 98 हजार 806 पुरुष व 1 लाख 3 हजार 17 महिला मतदार आहेत. त्यामुळे अलिबागमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यपदांच्या जागांच्या निवडणूकीत पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उमेदवारांचे भवितव्य महिलांच्या हाती असणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी साधारणपणे 1 हजार 400 कर्मचारी असणार असल्याचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच, या निवडणूकीत एका मतदाराला 2 उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचा एक व पंचायत समितीचा एक असे प्रत्येकी दोन उमेदवार असणार आहेत.
सखी, आदर्श मतदान केंद्र उभारणार
अलिबागमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 5 फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान होणार आहे. त्यासाठी 261 केंद्रामध्ये मतदान होणार आहे. मतदानासाठी लागणारे इलेक्ट्रीक मतदान यंत्राचा 861 इतका साठा उपलब्ध आहे. त्यामध्ये कंट्रोल युनिट यंत्र 287 व बॅलेट युनिट यंत्र 574 इतके आहे. मतदानाच्या दिवशी आदर्श मतदान केंद्र व सखी मतदान केंद्र उभारले जाणार आहेत. तसेच, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी वेगळी रांग असणार आहे. तसेच, त्यांच्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.
दुबार मतदारांवर राहणार नजर
मतदान करताना कोणताही गैरप्रकार घडू नये, म्हणून दुबार मतदारांची माहिती घेण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून अलिबाग तालुक्यात प्राप्त मतदार यादीमध्ये समान नावांची नोंद असलेल 9 हजार 99 संभाव्य दुबार मतदार आढळून आले आहेत. त्यापैकी छायाचित्र समान असलेल्या मतदारांची पडताळणी केली असता त्यापैकी 2 हजार 282 मतदार दुबार आढळून आले आहेत. या मतदारांकडून जोडपत्र एक भरून घेण्यात येणार आहे. आतापर्यंत 99 टक्के मतदारांकडून जोडपत्र एक भरून घेण्यात आले आहेत. या दुबार जोडत्रात मतदार कोणत्या केंद्रात मतदान करणार आहे, हे लिहून घेण्यात आले आहेत. त्यामुळे दुबार मतदारांवर नजर राहणार असल्याचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी सांगितले.






