कृषीवलच्या दणक्याने प्रशासनाला जाग

शाळांमध्ये जाऊन पोषण आहाराचे नमुने तपासले

| पेण | प्रतिनिधी |

कृषीवलमध्ये 28 जून रोजी ‌‘विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून पेण तालुक्यातील निकृष्ट पोषण आहाराचा लेखाजोखा मांडला. निकृष्ट आहार देऊन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ चालल्याचा पर्दाफाश केल्यानंतर वातानुकूल खोल्यामध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. निकृष्ट दर्जाचे आलेले सामान व धान्याविषयी ठेकेदाराला जबाबदार धरण्यापेक्षा मुख्याध्यापकांचीच शाळा गटशिक्षण अधिकारी अरुणादेवी मोरे व जिल्हा पोषण आहार अधीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी घेतली. काय तर, चोर सोडून संन्यासाला फाशी असेच म्हणावे लागेल.

मुख्याध्यापकांनी सामान व धान्य उतरवून घेताना त्याचा दर्जा तपासून घेण्ो गरजेचे असते. नंतरच ते सामान उतरवून घ्यायचे असते. परंतु, मुख्याध्यापकांचे म्हणणे असे आहे की, आम्ही सामान परत पाठवल्यास आमचे वरिष्ठ अधिकारी आम्हालाच जबाबदार धरतात आणि सामान पुन्हा येत नाही. एकंदरीत काय तर, धान्य व सामान पुरवणाऱ्या ठेकेदाराच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त असल्याशिवाय तो असे धाडस करू शकत नाही, अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे.

आज तालुक्यातील काही शाळांमध्ये जाऊन धान्य प्रत्यक्ष तपासले तर काही शाळांमधून धान्याचे नमुने मागवून घेतल्याची माहिती जिल्हा पोषण आहार अधीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. तसेच दोषींवर कारवाई करणार असून, ठेकेदाराला विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करू दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

Exit mobile version