जुलै महिन्यात वाहून गेलेल्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगराच्या अर्ध्या पायथ्याशी राहणार्‍या आदिवासी वाड्यांचा रस्ता पावसाळ्यात वाहून गेला आहे. या रस्त्याचे काम स्थानिकांनी श्रमदान करून केले होते, मात्र पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ता वाहून गेला आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी स्थानिक आदिवासी कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांपासून सर्व लोकप्रतिनिधी यांना आपली व्यथा सांगितली आहे. दरम्यन, कोणतीही यंत्रणा या आदिवासींच्या प्रश्‍नाकडे लक्ष देत नसल्याने आता बेकरेवाडी येथील दोन तरुण 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार आहेत.


माथेरान डोंगरमध्ये 12 आदिवासी वाड्या असून या आदिवासी वाड्या वन विभागाच्या दळी भूखंडावर वसल्या असून किमान दीडशे वर्षे हे आदिवासी लोक त्या ठिकाणी वस्ती करून आहेत. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे साकव पुलांचे मोठे नुकसान झाले आणि त्यामुळे जुम्मापट्टी धनगर वाडा पासून आसलवाडी हा साधारण पाच किलोमीटरचा रस्ता लहान वाहने जाण्यासाठी देखील सुरक्षित राहिलेला नाही.त्यामुले या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आदिवासी सेवा संघाचे कार्यकर्ते जैतू पारधी आणि गणेश पारधी यांनी सर्व सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना लेखी पत्र देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. परंतु रस्ता वाहून गेल्यानंतर आता सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. पण शासनाने त्या पाच किलोमीटर रस्त्याची दुरुस्तर करण्याची कोणतीही कार्यवाही केली नाही. शासन आदिवासी लोकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता आदिवासी लोक आक्रमक झाले आहेत. येत्या 26 जानेवारी रोजी देशाचा प्रजासत्त्त्ताक दिन साजरा होत असताना हे आदिवासी लोक आत्मदहन करणार आहेत.

Exit mobile version