केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती, रासायनिक वायू सोडून हवा प्रदूषण
| नवी मुंबई । वार्ताहर ।
नवी मुंबई महानगरपालिका शहराला अव्वल स्थानी आणण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात नवी मुंबई शहर देशात तिसर्या स्थानावर आहे तर पुण्यानंतर राहण्यायोग्य शहरात नवी मुंबईचा दुसरा क्रमांक लागत आहे. एकीकडे या सर्व जमेच्या बाजू असताना, दुसरीकडे नवी मुंबई शहरातील हवा प्रदूषण पातळी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रीय वायू गुणवत्ता निर्देशांक- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या निर्देशांक मूल्यातून नवी मुंबईची हवा ही अति खराब असून हवा गुणवत्ता निर्देशांक 265 वर पोहोचला आहे. मुंबईचा हवा निर्देशांक 192 इतका आहे.
एकीकडे शहरात स्वच्छता ठेवण्यात येत असली तरी दुसरीकडे सध्या शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. याचे एक कारण म्हणजे औद्योगिक कंपन्यांमधून रात्रीच्या वेळी रासायनिक वायू सोडून मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण केले जात आहे. औद्योगिक वसाहतीतील रबाळे, पावणे येथील कंपन्या थंडीच्या दिवसात धुक्याचा आसरा घेत मोठ्या प्रमाणावर हवेत रासायनिक मिश्चित वायू सोडतात. वाशी, बोनकोडे, कोपरी गाव, नेरुळ, कोपरखैरणे, घणसोली हे विभाग औद्योगिक वसाहतीला लागून आहेत त्यामुळे या विभागात वायू प्रदूषणाचा अधिक परिणाम जाणवत आहे.
नॅशनल एक्यूआय- सीपीसीबीच्या अहवालाच्या मंगळवार (दि.8) च्या नोंदीनुसार नवी मुंबई शहरातील हवा अति खराब यादीत समाविष्ट होत असून हवा गुणवत्ता निर्देशांक 305 वर गेला आहे. आज बुधवार दुपारपर्यंत कोपरखैरणेचा हवा गुणवत्ता निर्देशांक 187 एक्यूआय आणि नेरुळ 275 एक्यूआय आणि 325 एक्यूआय इतकी नोंद झाली आहे. हवा गुणवत्ता स्थिती अधिक प्रदूषित नोंदवण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता सर्वेक्षणात करोडो रुपये खर्च करून शहर स्वच्छता ठेवण्यात आघाडी घेत आहे परंतु स्वच्छते बरोबरच दुसरीकडे नवनिर्वाचित आयुक्त राजेश नार्वेकर नवी मुंबईच्या हवा गुणवत्तेकडे ही लक्ष देणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
नवी मुंबई शहरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून हवा गुणवत्ता केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत . नॅशनल एक्यूआय- सीपीसीबीच्या अहवालातिल महितीची पडताळणी करण्यासाठी या केंद्रातून शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक अहवाल तपासण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल.
जयंत कदम,
उपप्रादेशिक अधिकारी,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई