असं फारच कमी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत घडलंय. अखेरच्या साखळी सामन्यापर्यंत स्पर्धेचे चित्र स्पष्ट झालं नाही. आज इंग्लंडने श्रीलंकेवर मात करीपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या जीवात जीव होता. इंग्लंड जिंकले आणि यजमान ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या आव्हानाने जीव सोडला.
दुसरीकडे विश्वविजेते होण्याचे स्वप्न बाळगून ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारताच्या, झिम्बाब्वेविरुद्ध अखेरच्या साखळी लढतीच्या विजयाची हमीही 100 टक्के द्यायला कुणी तयार नाही. दुसरीकडे, हॉलंडने आफ्रिकेला पराभूत करुन या विश्वचषकातील धक्कादायक निकालांची परंपरा राखली तर पुन्हा एकदा त्रांगडं निर्माण होणार आहे. मग मात्र पाकिस्तानला बांगलादेशला हरवून अनपेक्षितपणे उपांत्य फेरी गाठण्याची संधी उपलब्ध होईल. या जर-तरच्या गोष्टी असल्या तरीही या विश्वचषक स्पर्धेतील नवोदितांनी प्रतिथयश संघांना दिलेले पराभवाचे धक्के पाहता, काहीही शक्य होऊ शकते.
भारतीय संघ झिम्बाव्बेकडून पराभूत होणे हे जेवढे कठीण आहे, तेवढेच दक्षिण आफ्रिका संघ हॉलंडकडून. एक गोष्ट मात्र आज स्पष्ट झाली; ती म्हणजे, ऑस्ट्रेलियन संघ स्वतःच्याच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ‘पार्टी विदाऊट होस्ट’ अशी सध्या अवस्था ऑस्ट्रलियन क्रिकेट शौकिनांची झाली आहे. मात्र, सध्याचे ऑस्ट्रेलियातील क्रिकेटप्रेम पाहता, ऑस्ट्रेलियाचा पराभव कुणी फारसा मनाला लावून घेतलेला दिसत नाही.
गुरुवारी अॅडलेडमधील रेल्वेने प्रवास करीत असताना एक तिकीट तपासनीस भेटला होता. अस्सल क्रिकेट शौकिन होता. कारण, तो भारत-बांगलादेश सामन्यालाही आला होता. त्याने आम्हाला छातीठोकपणे सांगितले; उपांत्य फेरीचा भारताचा सामना इंग्लंडशी अॅडलेडमध्येच होईल. त्याला विचारलं, एवढं ठामपणे कसं सांगू शकतोस? त्यावर म्हणाला, बरेच माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जे सध्या कॉमेंटरी करताहेत, ते माझे मित्र आहेत. त्यांच्याकडून बर्याच गोष्टींचे आकलन होत असते. असो…
आज भारतीय संघाने, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सराव केला. रविचंद्रन आश्विनने पत्रकारांसोबत वार्तालाप करताना सांगितले की, खेळपट्टीची उसळी व मोठी मैदाने यामुळे गोलंदाजाला अधिकाधिक उसळते चेंडू टाकायचा मोह होऊ शकतो. आणि, हे आखूड टप्प्याचे चेंडू खेळपट्टीवर गेल्यानंतर तटविण्याचा किंवा त्यांचा सामना करण्याचा विचार किंवा योजना आखता येत नाही. त्यामुळे आज भारतीय खेळाडूंनी अधिकाधिक आखूड टप्प्याचे चेंडू खेळण्याचा सराव केला. सपोर्ट स्टाफदेखील या कामासाठी वापरण्यात आला. काही जणांनी तर अंडरआर्म चेंडू टाकून फलंदाजांना सराव दिला. भारतीय संघात उद्या दोन बदल संभवतात. यजुवेंद्र चहलच्या लेग ब्रेक गुगलीला उद्या झिम्बाब्वेसमोर अजमाविले जाईल, असा अंदाज आहे. हर्षल पटेलच्या मध्यमगतीचीही उद्या कदाचित चाचपणी होईल. फलंदाजीत फारसे बदल संभवत नाहीत, तसेच यष्टीपाठी एवढ्यात आपण ॠषभ पंतला पाहू असे वाटत नाही. तरीही झिम्बाब्वेचे एयुक जोंगवे, ब्रॅड इव्हान्स, चटारा, मुझरांबी यांच्यापैकी काही जण तरी आखूड टप्प्याच्या चेंडूवर भारतीय फलंदाजांची परीक्षा निश्चितच करु शकतात. मेलबर्नच्या मैदानाची उसळी निश्चितच त्यांच्यासाठी उपकारक आहे.
मेलबर्न मैदानावर भारतीय संघाचा सराव पहायला गेलो असता, सुनील गावसकर यांची भेट झाली. मैलबर्न मैदानाच्या त्यांच्याही अनेक आठवणी आहेत. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध विजयानंतरच्या आनंदाबाबत विचारले असता, ते म्हणाले की, तो व्हिडिओ कुणी काढला मला ठाऊक नाही, पण सामन्यानंतरच्या पृथक्करणासाठी मैदानात जाण्याच्या तयारीत होतो आणि शेवटच्या आठ चेंडूंतले रोमहर्षक क्रिकेट पाहिले आणि राहावले नाही. आनंदाने बेभान झालो.