। मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याच्या फेर प्रस्तावावर शनिवारी (16 जुलै) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मोहर उठवली आहे.
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार 12.56 योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्व. पाटील यांचे योगदान आहे. तद्नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरवावयाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले 22.5% योजनेचे धोरण सुद्धा 12.5% धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.
नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून 1160 हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाला दिवंगत दि .बा .पाटिल यांचे नाव देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यानी तीव्र आंदोलन छेड़ले होते त्यास अखेर यश मिळाले आहे.
औरंगाबादचे नामकरण
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने 29 जून 2022 च्या मंत्रिमंडळ बैठकित नामकरणाच्या 3 प्रस्तावांना मंजूरी दिली होती. मात्र आघाडी सरकार कोसळल्या नंतर आलेल्या शिंदे सरकार ने सदरचे प्रस्ताव अवैध ठरवले होते. त्या प्रस्तावास आज फेर मान्यात देण्यात आली आहे.या प्रस्तावाला केंद्रशासनाची मंजुरी मिळाल्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.