दि. बां.चे नाव देण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही का ; दशरथ पाटील यांचा सवाल
सोमवारी पनवेलमध्ये पुन्हा प्रकल्पग्रस्तांची बैठक
| पनवेल | प्रतिनिधी |
दोन वर्षांपासून आगरी व कोळी समाज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत. यापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना हे आंदोलन तीव्र झाले. मात्र महायुतीचे सरकार सत्तेत राज्य व केंद्र सरकार तातडीने नामकरणाचा निर्णय घेईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने प्रकल्पग्रस्त पुन्हा आक्रमक झाले आहेत. याबाबत सोमवारी बैठक होणार असून त्यात नामकरण आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत.
केंद्र सरकारकडे राज्य सरकारने नामकरणाबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र पाठविलेल्या नामकरणाच्या मसुद्यात काही त्रुटी असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे त्रुटी दूर करन नवीन मसुद्यात नामकरण प्रस्ताव राज्य सरकारला पाठवावा लागणार आहे. यामुळे नेमके राज्य सरकार दि. बा. पाटील यांच्या नावाप्रती गंभीर नाही का असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना सतावत आहे. याच विषयावर आंदोलन करुन राज्य व केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी सोमवारी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने आयोजित केली आहे. ही बैठक पनवेल शहरातील आगरी समाज हॉलमध्ये सायंकाळी 4 वाजता होणार असल्याची माहिती कृती समितीने दिली.
या बैठकीमध्ये विमानतळ नामकरण, एमआयडीसी व औद्योगिकरण, गावठाण विस्तार समितीच्या प्रश्नांसाठी पदाधिका-यांची निवड करणे, सिडको मंडळामधील प्रश्नांसाठी चर्चा करणे अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. प्रकल्पग्रस्त तरुणांमध्ये दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केंद्र सरकारने न केल्याने असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे तरुण प्रकल्पग्रस्तांकडून केंद्र सरकारला जाग येण्यासाठी कृती समितीने तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा घ्यावा अशी मागणी होत आहे.