अलिबाग-रोहा रस्त्याच्या सर्वेक्षणाचा विळखा कायमच

| अलिबाग | प्रतिनिधी |

रस्त्यावरील धुळीचे साम्राज्य, ठिकठिकाणी असलेले खड्डे, अपूर्ण काँक्रीटीकरण अशा अनेक समस्यांमुळे अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यांना चांगल्या रस्त्याची आजही प्रतिक्षा आहे. दरम्यान, कंत्राटदाराने दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा याच रस्त्याचे सर्वेक्षण जीपीएसद्वारे सुरु केले आहे. त्यामुळे ही सततची सर्वेक्षणे संपणार तरी कधी, असा प्रश्न विचारला जात आहे.

अलिबाग-रोहा मार्गावरील रस्ता चांगल्या पध्दतीने व्हावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून आ.जयंत पाटील व माजी आमदार पंडित पाटील यांनी निधी मंजूर करून घेतला. त्यांच्या प्रयत्नाने सुमारे 168 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु प्रशासनाकडून दिरंगाई झाल्याने या रस्त्यावरील खड्डे वाढत गेले. अलिबाग-रोहा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळही वाढल्याने खड्यांमुळे अपघात होऊ लागले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या रस्त्याचे कंत्राटदाराने काम सुरु केले. मात्र वेलवळी खानाव ते एचपी कंपनी उसरपर्यंत काँक्रीटीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याने पावसाळ्यातही नागरिकांना खड्डयातून प्रवास करावा लागला.

दसऱ्यानिमित्त मंगळवारी पुन्हा एकवार येथे रस्त्याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. मुंबई येथील जे.जे. इंजीनिअर या कंपनीमार्फत जीपीएसद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. त्यासाठी पाच कामगार काम करीत आहेत. या मार्गावरील लहान मोठया पुलासह गावाजवळ काँक्रीटीकरण केले जाणार आहे. त्यानुसार या कंपनीद्वारे सर्वेक्षण सुरु आहे. आठ दिवस हे सर्वेक्षण चालणार असल्याची माहिती रवी जाधव यांनी दिली. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना आणखी किती दिवस सुखकर रस्त्यासाठी वाट पहावी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत कार्यकारी अभियंता जे.ई. सुखदेवे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

वराती मागून घोडे ?
अलिबाग-रोहा मार्गावरील गावांतील रस्त्यालगत काँक्रीटीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाळ्यात खड्डयांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा प्रयोग केला जाणार आहे. त्यासाठी या रस्त्यावरून किती व कोणत्या प्रकारची वाहने धावतात, याचा सर्व्हे एका संस्थेद्वारा सुरु करण्यात आला आहे. आठ दिवस हा सर्व्हे सुरु राहणार आहे. मात्र मुळ काम सुरु होण्यापूर्वीच हे सर्वेक्षण का केले गेले नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
Exit mobile version