अलिबाग-रोहा रस्ता विधानपरिषदेत गाजला

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणार; आ.जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

। मुंबई । प्रतिनिधी ।

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाचा प्रश्‍न आज विधानपरिषदेत चांगलाच गाजला. शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी यातील गैरव्यवहाराचा मुद्दा लावून धरला. अखेरीस या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, अशी हमी बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

अलिबाग ते रोहा या रस्त्याच्या 177 कोटी रुपयांच्या कामातील भ्रष्टाचाराबाबतचा मुळ प्रश्‍न जयंत पाटील यांनी विचारला होता. त्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी करारनाम्यातील तरतुदींनुसार 13.14 कोटी रुपये इतकी आरंभीची रक्कम कंत्राटदाराला दिलेली असून सुडकोली गावाजवळ त्याने बॅच मिक्स प्लान्ट आणि रेडीमिक्स प्लान्ट उभारले आहेत असे लेखी उत्तरात सांगितले. त्यानंतरही या रस्त्याचे काम सुरू झाले नाही हे मंत्र्यांनी मान्य केले. मात्र तरीही हे कंत्राट रद्द न करता त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानुसार 22 जुलै 2022 पासून दर दिवशी 89,000 रुपये याप्रमाणे त्याच्याकडून नुकसानभरपाई वसूल करण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्या हिशेबाने आजतागायत ही सुमारे दोन कोटी इतकी रक्कम होते.

2017 साली आ. जयंत पाटील व पंडीत पाटील यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मार्गासाठी विशेष तरतूद केली होती. मात्र त्यानंतर स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींनी विविध कारणांमुळे अडथळे आणल्यामुळे ते काम पुढे सरकू शकले नाही. अखेर गेल्यावर्षी या कामाच्या निविदा नव्याने काढण्यात येऊन नवीन ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली. मात्र तरीही हे काम रेंगाळत राहिले. या पार्श्‍वभूमीवर या कामातील दिरंगाई व ठेकेदाराचा कारभार लक्षात घेता या रस्त्याची फेरनिविदा काढण्यात यावी, अशी जोरदार मागणी आ. जयंत पाटील यांनी केली होती.

…तर स्वपक्षीयांवरही कायदेशीर करु
अलिकडेच गुढी पाडव्याला या रस्त्याचे काम पुन्हा सुरु झाले. त्यावेळी शिंदे गट आणि भाजपचे स्थानिक नेते यांच्यात या कामाचे श्रेय घेण्यावरुन शाब्दिक चकमकी झाल्या होत्या. आ. जयंत पाटील यांनी सभागृहात आज त्याचा उल्लेख केला. त्या संदर्भात बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यापुढे स्थानिक लोकप्रतिधींनी अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. प्रसंगी, या संदर्भात स्वपक्षातील नेत्यांचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा चव्हाण यांनी दिला.

काम कुणाचे, श्रेय कुणाचे
या कामाचे श्रेय घेण्यासाठी नेहमीच नवनविन लोक पुढे येत असतात. खरे पाहता हा रस्ता आ. जयंत पाटील व पंडीत पाटील यांच्या प्रयत्नामुळे 2017 मध्येच मार्गी लागला होता. मात्र 2019 मध्ये निवडून आलेल्या स्थानिक आमदारांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. याच श्रेयवादाचा पुढचा अंक नुकताच गुढीपाडव्याला सुरु झालेल्या कामाच्यावेळीही दिसून आला.

निविदा प्रक्रिया तीन वेळा राबवण्यात आली त्यावेळेस निवडणूक केला सहा महिने शिल्लक राहिले होते या निविदाची प्रक्रियाला विलंब लागल्याने आचारसंहिता लागली त्यामुळे या कामाला सुरुवात करता आली नाही. आचारसंहिता सुरू असल्याने हे काम सुरू झाले नाही. निवडणूक पूर्ण झाल्यानंतर तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या कंत्राटदाराला विविध मागण्या करून अडथळे निर्माण करू लागले. परंतु अलिबाग रोहा रस्ता हा तत्कालीन सार्वजनिक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जयंत पाटील यांच्या आग्रही मागणीमुळे मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला. सदरच्या कंत्राटदाराने स्थानिक लोकप्रतिनिधीला त्यांनी केलेल्या विविध मागण्या मागण्याची पूर्तता करू नये, सातत्याने त्यांच्या मागण्या वाढू लागल्याने कंत्रालदार हतबल होऊन सदरचे काम कंत्राटदाराने थांबवले. अलिबाग रोहा या रस्त्यासाठी या कंत्राटदारास 14 कोटी मोबिलायझेशन ॲडव्हान्स देण्यात सुद्धा आला होता.

Exit mobile version