जावेळे पुलाच्या पर्यायी मार्गालाही भगदाड

। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे येथील नदीवरील पडलेल्या पुलाच्या बांधणीचा प्रश्न दोन वर्षे उलटूनही अद्याप रखडला आहे. सध्या पावसाळ्यात पाण्याखाली आलेल्या पर्यायी मार्ग खचला गेल्याने हा रस्ता ओलांडणे आता ग्रामस्थांना धोकादायक ठरत आहे.

जावेळे येथील नदीवरील हा पूल २५ ऑगस्ट २०२० मध्ये पावसाळ्यात अचानक कोसळला, तालुक्यातील नदीपलीकडचा भाग डोंगराळ असून, विशेषतः रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा मार्ग आहे. या मार्गावरील वाहने श्रीवर्धन ते गालसुरे पुढे आंबेतमार्गे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे पोहचतात. येथील वडशेत, वावे, साखरोने व धारवली या गावाकडे जाण्यासाठी पक्क्या स्वरुपाचा मार्ग नाही. त्यामुळे नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी तेथील ग्रामस्थ सातत्याने करीत आहेत. त्याबाबत शासनाकडे लेखी स्वरुपात पाठपुरावा केला गेला.

श्रीवर्धनकडे जाणारा पूल दोन वर्षांपूर्वी अचानक कोसळून पडला होता. हा पूल जिल्हा परिषदच्या अखात्यारीत्या असल्याने पुलाच्या पुनर्बांधणीसाठी संबंधित जिल्हा परिषद विभाग तसेच याला पर्याय म्हणून बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आले. पण, अजून पूल काही मार्गी लागलेला नाही. त्यावेळी नदीपलीकडे जाण्यासाठी मोऱ्या टाकून पर्यायी मार्ग तयार केला खरा मात्र, तो देखील सुरक्षित नाही. या पावसाळी दिवसात मार्गावर पुराचा वेढा पडत असतो. याशिवाय पुराच्या पाण्याचा मारा होऊन रस्त्याला भले मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत वाहतूक तसेच येणे जाण ठप्प होत आहे. नदी पलीकडे असणाऱ्या वडशेत, वावे, साखरोने आणि धारवली या गावांना पडलेल्या पुलामुळे अडचण झाली आहे. यंदा तरी पावसाळ्या पूर्वीच या पुलाचे काम होणे गरजेचे होते, येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे.

पायपीट थांबणार कधी ?
सध्या अतिवृष्टीमुळे पर्यायी रस्त्यावर पाणी येत असल्याने मार्ग बंद झाल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागतं आहे. नेहमीच दैनंदिन खरेदीसह, शालेय विद्यार्थी तसेच रुग्ण यांना सहा किलोमीटर अंतरात पायपीट करत वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

उलट – सुलट प्रवासाने ग्रामस्थ मेटाकुटीला
पावसाळ्यात पर्यायी पुलावरून श्रीवर्धनकडे जाण्यासाठी येथील आडी, वडशेत, वावे, साखरोने, धारवली येथील ग्रामस्थांना कोलमांडला, बागमांडला असा उलट – सुलट प्रवास १५ किलोमीटर जास्तीचा करावा लागत आहे.

पूल नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, अनेक वेळा निवेदन देऊन देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. पर्यायी मार्गावरील रस्त्याला आता पावसाच्या पाण्यामुळे भगदाड पडलं आहे. त्यामुळे आम्हा गावकऱ्यांचा प्रवास धोकादायक बनला आहे. – सागर सावंत, ग्रामस्थ.

Exit mobile version