अतिवृष्टीचा फटका! आंबेत नांदवी घाटात दरड

। आंबेत । गणेश म्हाप्रळकर ।
अचानक झालेल्या ढगफुटीच्या मुसळधार पावसात सोमवारी (दि.4) सर्वत्र पाण्याच्या पातळीत वाढ झाली. नद्या, नाले तुडुंब वाहू लागले. आंबेत नांदवी घाट देखील या मुसळधार पावसात वाहून गेला असून संपूर्ण घाट रस्ता हा सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. घाटातील मुख्य वळणांवर मातीचा भाग मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने संपूर्ण रस्त्यांचा भाग हा बंद झाल्याची घटना समोर आली आहे.

पोलीस यंत्रणा या घटनास्थळी दाखल होऊन स्थानिक गावकर्‍यांच्या मदतीने काल घाटातील बहुतांश वृक्ष कोलमडून पडलेला भाग हटविण्यात आला. यावेळी आंबेत येथील चेक पोस्ट हेड कॉन्स्टेबल रसाळ, विजय पिंगळे यांसह नांदवी, आंबेत, पुरार येथील ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीच खबरदारी या बाबतीत घेतली नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आंबेत नांदवी घाट हा तीव्र वळणांचा असून यामध्ये अनेक मोठमोठे वृक्ष ही धोकादायक परिस्थितीत आहेत. याबाबत कोणतीही उपाययोजन न केल्याने या मार्गावरुन जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

आंबेत नांदवी घाटात दरवर्षी दरडी कोसळण्याचे प्रमाण पावसाळ्यात होते. प्रशासनाकडून तीव्र वळण असलेल्या भागात आणखी मोठ्या प्रमाणात लोखंडी बॅरिगेट्स अथवा संरक्षित भिंती बांधणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकाराला आळा बसेल.

– रविभाऊ पाष्टे, मनसे संपर्क अध्यक्ष, म्हसळा

Exit mobile version