रामेश्‍वर येथील पुरातन विहीर झाली पुनरुज्जीवित

निसर्गमित्रतर्फे जल, वृक्ष, निसर्ग व पुरातन वास्तू संवर्धन मोहीम

| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील वरचे रामेश्‍वर येथील जवळपास शंभर वर्षे जमिनीखाली गाडली गेलेली ऐतिहासिक पुरातन विहीर पुनरुज्जीवित करण्यात आली आहे. निसर्गमित्र पनवेलतर्फे शुक्रवार (दि.24) पासून तीन दिवस ही मोहीम राबविण्यात आली असून यावेळी निसर्ग व पुरातन वास्तू संवर्धनसुद्धा करण्यात आले.

सुधागड तालुक्यातील उद्धर येथील पुरातन वरचे रामेश्‍वर मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. मंदिरावरील शिलालेख पाहता या मंदिराची बांधणी 1664 सालची आहे. मंदिरासमोरील एक विहीर गाळाने पूर्ण भरलेली होती. गावातील म्हातारी माणसांनी देखील ही विहीर गाळाने बुजलेलीच पाहिली आहे. निसर्गमित्र संस्थेच्या वार्षिक श्रमदानात ही विहीर पूनुरुज्जिवित करण्याचे ठरले. या मोहिमेचे नेतृत्व सचिन शिंदे व प्रिसिलिया मदन यांनी केले. उपस्थित साधारणतः 60 मुलं-मुली, तरुण-तरुणी व स्त्री-पुरुष कार्यकर्ते या मोहिमेत प्रदीप लांगी व स्थानिक तरुण कार्यकर्ता राजेश दाबसे यांचे सहकार्य लाभले.

असे केले पुनरुज्जीवित
निसर्ग संवर्धनाच्या कामानिमित्त सुधागड तालुक्यातील उद्धार रामेश्‍वर या पर्यटन निसर्गमित्र संस्थेचे सभासद गेल्यानंतर येथे एक पुरातन असलेली परंतु बुजलेल्या स्थितीत व नामशेष झालेला अवस्थेत असलेली विहीर त्यांच्या निदर्शनास आली. या आजूबाजूच्या परिसरात माहिती घेतली असता सदरची विहीर अनेक वर्षांपासून मातीचा भराव पडल्याने बुजलेल्या अवस्थेत आहे. परंतु या विहिरीत जिवंत पाण्याचा स्त्रोत असल्याचे समजले. निसर्ग मित्र संस्थेच्या सभासदांनी पुढाकार घेऊन या विहिरीतील संपूर्ण माती दगड, गोटे व गाळ उपसून विहिरीतून जलस्त्रोत पुनर्जीवित केला. आणि अशा प्रकारे 50 ते 60 फूट खोल आणि सात ते आठपर्यंत असलेल्या वरच्या रामेश्‍वर येथील ऐतिहासिक विहिरीचे पुनरुज्जीवन झाले.
जलसंवर्धन कामे
या मोहिमेत वरचे रामेश्‍वर येथील ऐतिहासिक विहीरीचे पुनर्जीवन करण्याबरोबरच देवराईत वाहणार्‍या ओढयांवर 3 बंधारे घातले गेले. गणेश कुंडमधील पाणी उपसून गाळ काढण्यात आला.
निसर्ग व वृक्ष संवर्धन
या मोहिमेत देवळाच्या परिसरात बहावा, वड, मोह, बेल अशी 8 झाडे लावली गेली. ही झाडे सभासदांनी व संस्थेचे अध्यक्ष डॉ. आशिष ठाकूर यांनी घरी वाढवली होती. जी त्यांना वाढदिवसानिमित्त पराग सरोदे यांनी भेट दिली होती. याशिवाय सोबत नेलेल्या हजारो बिया (आंबा, फणस, चिंच, करवंद, लिंब, सीताफळ ई.) परिसरात व देवळाकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा लावल्या गेल्या.
पुरातन वास्तू संवर्धन
दगडी उंच दीपमाळेचा पार रुंद करून त्याचा पाया अधिक मजबूत केला गेला.
निसर्ग मित्र संस्थेचे धनंजय मदन यांनी सांगितले की, पाण्याचा प्रश्‍न जटील होत आहे व भूगर्भातील पाणी (वॉटर टेबल) आटत चालल्याने त्यावर उपाय म्हणून तरुणांनी समाजाला दिशा दाखविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न म्हणून याकडे पाहता येईल. सहभागी मुलांना त्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा आवाक्याचा त्यांना साक्षात्कार झाला असेल आणि त्यातून त्यांचा आत्मविश्‍वास दुणावला असेल. मुलांवर दृश्य सकारात्मक संस्कार व्हावेत हा त्यामागचा हेतू होता. मुलांनीही हिरीरीने व उत्साहाने कामे करून सगळ्याना जिंकून घेतले.
Exit mobile version