रस्त्याच्या कडेला तिष्ठत उभे राहण्याची वेळ
। पाली । वार्ताहर ।
रोह्यावरून सिल्लोडला जाणारी एसटी बस शनिवारी (दि.15) तब्बल पावणेतीन तास उशिराने पालीत आली. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. यातच प्रवाशांना भर पावसात रस्त्याच्या कडेला तिष्ठत उभे राहून बसची वाट बघावी लागली. महिला, लहान मुले व वृद्ध प्रवासी यांचे खूप हाल झाले. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
रोहा-सिल्लोड एसटी बस रोह्यावरून सुटून पालीमध्ये सकाळी सात वाजताच्या दरम्यान येते. मात्र, ब्रेक डाऊन झाल्यामुळे ही गाडी पालीमध्ये पावणेदहा वाजता आली. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले. रिझर्वेशन केलेल्या प्रवाश्यांनादेखील कोणतीही माहिती परिवहन महामंडळाकडून देण्यात आली नाही. तसेच, ही बस पाली बस स्थानकात जात नसल्यामुळे पालीच्या बाहेर रस्त्यावर वाट पाहत उभे राहावे लागते. यामुळे प्रवाशांना बसबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. काही प्रवासी बसची वाट पाहून कंटाळून इतर वाहनांचा आधार घेत पुढे गेले. मात्र, रिझर्वेशन केलेल्या प्रवाशांना हकनाक थांबून राहावे लागले. त्यातील काही प्रवासी नाईलाजाने पदारमोड करून इतर वाहनांनी पुढे गेले.
पाली बस स्थानकात गाड्या जात नाही पाली बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. मागील चार वर्षांपासून बस स्थानकाचे नूतनीकरणाचे काम ठप्प आहे. त्यातच रोहा येथून पुणे व सिल्लोडला जाणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या पाली बस स्थानकात न जाता पालीच्या बाहेरून जातात. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना पालीच्या बाहेर येऊन बसची वाट पाहत उभे राहावे लागते.
अरुंद रस्ते व मोठ्या बस यासंदर्भात रोहा बस स्थानकातील कर्मचार्यांनी सांगितले की, रोहा-पुणे या हिरकणी बसेस तसेच रोहा-सिल्लोड ही बस लांब व मोठ्या आहेत. पालीतील अंतर्गत रस्ते हे अरुंद आहेत. तसेच, काही ठिकाणचे वळण मार्ग हेदेखील छोटे व अरुंद असल्यामुळे बसला तेथून मार्गक्रमण करता येत नाही व अडचण येते. परिणामी पाली बस स्थानकात या गाड्या जात नाहीत.
बस ब्रेक डाऊन झाली आहे याची माहिती रिझर्वेशन केलेल्या प्रवाशी यांच्या मोबाईलवर कळवणे गरजेचे होते. ही माहिती मिळाली असती तर प्रवासी इतका वेळ ऊन-पावसात तिष्ठत उभे राहिले नसते. रोह्यावरून पाली मार्गे पुण्याकडे जाणार्या सर्व बसेस पाली स्थानकात जात नाहीत, त्या बाहेर थांबतात. किमान या ठिकाणी रस्त्याच्या कडेला प्रवाशांसाठी प्रवासी शेड उभी करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांना ऊन वार्यापासून संरक्षण मिळेल व बसतादेखील येईल.
कल्पेश शहा, नागरिक, पाली
