| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागांव संचालक मंडळाच्या प्राथमिक व हायस्कुल शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दि.22 व 23 डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कला गुणांचे सादरीकरण करून उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
सोमवारी (दि.22) नागांव संचालक मंडळाचे अध्यक्ष एम.एन. पाटील यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भावेश्री वाळंज, हायस्कुल शाळेचे मुख्याध्यापक अजित पाटील, शिक्षक नवनाथ जाधव, विशाल शेजुळ, मानसी ठाकूर, प्रणाली भगत, ओवी पोईलकर, नृत्तया राऊळ, तेजश्री तारकर, मिताली प्रधान, संजना प्रधान, सेविका लिना देशमुख, शालिनी राणे व हर्षला राऊळ यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व दोन्ही शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन मुख्याध्यापिका भावेश्री वाळंज यांनी केले. या दोन दिवसीय कार्यक्रमात दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले सुप्त कलागुण सादर केले. यावेळी लावणीसह कोळीगीते आणि पारंपारिक नृत्याचा जल्लोष रसिकांना याची देही याची डोळा अनुभवायला मिळाला.








