कोण घेणार माघार?

उद्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार


। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठी 111 उमेदवारांनी 140 उमेदवारी अर्ज भरले होते. बुधवारी झालेल्या छाननीत 22 अर्ज अवैध, तर 118 अर्ज वैध ठरविण्यात आले. सोमवारी (दि.4) दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोण माघार घेणार, कोण निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

अलिबाग विधानसभा मतदारसंघातील 22 उमेदवार वैध ठरले आहेत. महाडमधील पाच, श्रीवर्धनमधील 12, पेणमध्ये 12, कर्जतमध्ये 12, उरणमध्ये 16 पनवेलमध्ये 15 उमेदवार छाननीमध्ये वैध ठरविण्यात आले आहे. सोमवारी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या अर्जांवरील माघार घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे कोण अर्ज मागे घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे दुपारी तीननंतर उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर खर्‍या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सभा, बैठका घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Exit mobile version