ई रिक्षांच्या आगमनामुळे हातरिक्षांचे भाव गगनाला

| माथेरान | प्रतिनिधी |

ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या मानव चलीत हातरिक्षा आजही माथेरानमध्ये कार्यरत आहेत. परंतु याठिकाणी अल्पावधीतच काळानुसार बदल घडणार असून गावात बॅटरीवर चालणार्‍या ई रिक्षा धावणार असल्याने जुन्या हातरीक्षांचे लवकरच इतिहास जमा होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत. एकूण 94 हातरिक्षा असणार्‍या परवानाधारक हातरिक्षा मालकांनाच या येणार्‍या ई रिक्षाचा ताबा मिळणार आहे.

त्यापलीकडे एकही नवीन ई रिक्षा वाढविण्यात येणार नसल्याने येथील स्थानिक धनाढ्य लोकांना आपल्या कुटुंबाची पायपीट वाचविण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी स्वतःची सुध्दा ई रिक्षा असावी जेणेकरून दस्तुरी पासून गावात आपल्या स्वतःच्या घरापर्यंत येण्यासाठी ई रिक्षा हाच एक उत्तम पर्याय निर्माण होणार आहे याकामी जुन्या हातरीक्षांचे परवाने मूळ हातरीक्षाच्या किमतीच्या कित्येक पटीने रक्कम वाढवून खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. मुळात ह्या हातरिक्षा बनविण्यासाठी जेमतेम दहा ते पंधरा हजार रुपये इतका खर्च यायचा. ज्यांची हलाखीची परिस्थिती आहे अशा काही हातरिक्षा मालकांनी सात ते आठ लाख रुपयांना हातरीक्षा आपल्या परवान्यांसोबत विक्री केल्या आहेत.

त्यामुळेच ई रिक्षांच्या आगमनामुळे निदान येथील काही गरजवंत श्रमिक हातरीक्षा मालकांना मोठा आधार मिळाला आहे. ई रिक्षामुळे पर्यटनात नक्कीच वाढ होणार आहे यात तिळमात्र शंका नाही. याच ई रिक्षाच्या माध्यमातून याठिकाणी खर्चिक पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन सर्वसामान्य स्टोल्स धारक असोत किंवा पॉईंट्स वरील छोटे छोटे दुकानदार असोत, वन डे फिरण्यासाठी येणारे पर्यटक हे हमखास दोन दिवस तरी इथे आपल्या मुक्कामी राहू शकतात. त्यामुळे सर्वांच्याच व्यवसायात निश्‍चितच भर पडणार आहे. लवकरच ई रिक्षाचा ताबा येथील श्रमिक हातरीक्षा मालकांना होणार आहे. त्यामुळे रात्री अपरात्री एक अत्यावश्यक सुविधा दिव्यांग, अपंग, जेष्ठ नागरिक पर्यटक, रुग्ण, गरोदर महिला यांना मिळणार आहे. सद्यस्थितीत इथे नगरपरिषदेच्या सात ई रिक्षा कार्यरत आहेत परंतु वेळेअभावी तसेच ई रिक्षांच्या अपुर्‍या संख्येमुळे सर्वानाच या सेवेचा लाभ मिळत नाही. त्यामुळेच माथेरान मधील बहुतांश ई रिक्षाचा लाभ घेणारे स्थानिक नवीन ई रिक्षांची प्रतीक्षा करत आहेत.

Exit mobile version