इतर राज्यातील आंब्याची आवक वाढली
| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
एपीएमसी बाजारात सध्या कोकणातील हापूसची आवक कमी होत असून इतर राज्यातील आंब्याची आवक वाढत आहे. बाजारात हापूस मागणीच्या तुलनेत कमी उपलब्ध होत असल्याने इतर राज्यातील आंबा खरेदीला ग्राहकांचा कल वाढत आहे. यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत हापूसची आवक वाढली होती. परंतु हापुसचा खरा हंगाम हा एप्रिल-मे महिन्यात सुरू होतो. मात्र आता आवक कमी होत असून मागील वर्षी एप्रिलमध्ये हापूसच्या 70-80 हजार पेट्या दाखल होत होत्या, पंरतु आता 25-35 हजार पेट्या दाखल होत आहेत. यावर्षी अवकाळी पावसाने हंगामाला उशिराने सुरुवात झाली, पंरतु उत्पादन चांगले असेल अशी अपेक्षा होती. मात्र अवकाळी पावसाने उत्पादनाला फटका बसेल या भीतीपोटी शेतकर्यांनी वेळेआधीच हापूसची तोडणी केली. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये चार पटीने आवक वाढली होती. एप्रिल-मे मध्ये हापूसचा खरा हंगाम सुरू होऊन मोठ्या प्रमाणात आवक असल्याने हापूसचे दरही अवाक्यात येतात. त्यामुळे सर्वसामान्यांची पावले हापूस खरेदीकडे वळतात. परंतु सध्या घाऊक बाजारात आवक कमी होत असून हापूसचे दर चढेच आहेत.
सोमवारी बाजारात कोकणातील 31 हजार 90 पेट्या तर इतर राज्यातील 48 हजार 496 पेट्या दाखल झाल्या आहेत. इतर राज्यातील आंब्याच्या तुलनेत कोकणातील आवक कमी होत आहे. एपीएमसीत प्रति डझन हापूसला 400-1000रुपये तर 4-6 डझन पेटी 2 हजार ते 4 हजार 500 रुपयांनी विक्री होत आहे. तेच मागील वर्षी एप्रिलमध्ये यंदाच्या तुलनेत हापूसचे दर 200 ते 500 रुपयांनी कमी होते. दर चढेच असल्याने ग्राहकांनी आपला मोर्चा आवाक्यात असणार्या कर्नाटक हापूस आंब्याकडे तसेच इतर आंबा खरेदीकडे वळविला आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत इतर राज्यातील आंब्याची आवक जादा असून ही 15-20 रुपयांनी अधिक दराने विक्री होत आहेत. हे आंबे प्रतिकिलो 80-140 रुपयांनी विकले जात आहेत. आता ही अवकाळी पाऊस, लहरी हवामानाने हापूसला फटका बसला आहे. त्यामुळे आवक कमी झाली आहे. मे मध्ये आवक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, परंतु ते गणित ही हवामानावर अवलंबून असल्याचे मत बागयदार यांच्याकडून व्यक्त होत आहे.