माहोल आयपीएलचा

केकेआरचा कर्णधार नितीश राणा

| चेन्नई | वृत्तसंस्था |

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा मालकी हक्क असलेला कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत दोनवेळा जेतेपद पटकावलं आहे. पण 2014 नंतर केकेआर संघाला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने 2012 आणि 2014 मध्ये अजिंक्यपद पटकावला होता. पण यानंतर एकाही कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही. आता आयपीएलच्या नव्या हंगामात नव्या उत्साहासह केकेआर मैदानात उतरणार आहे. पण त्यांच्या या उत्साहाला स्पर्धेआधीच धक्का बसला आहे. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असून त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रश्‍नचिन्ह आहे. अशात संघाचं नेतृत्व नितिश राणा याच्याकडे सोपविण्यात आले आहे.


श्रेयस अय्यरची कमी जाणवणार
धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरवर केकेआरने 2012 च्या लिलावात तब्बल 12 कोटी 25 लाख रुपये बोली लावून आपल्या संघात घेतलं. गेल्या हंगामात श्रेयस अय्यरने केकआरचं नेतृत्व केलं. श्रेयस अय्यर कर्णधार आणि प्रमुख फलंदाज आहे. पण यंदा खेळू शकणार नसल्याने श्रेयस अय्यरची कमी संघाला जाणवणार आहे. त्यामुळे प्लेईंग इलेव्हन निवडणं हे कोलकाता नाईट रायडर्ससमोरचं प्रमुख आव्हान असणार आहे.

केकेआरची प्लेईंग इलेव्हन
केकेआरच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये लिट्टन दास आणि व्यंकटेश अय्यर यांच्यावर सलामीची जबाबदारी असण्याची शक्यता आहे. लिट्टन दासवर फलंदाजीबरोबर विकेटकीपर अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. तर व्यंकटेश अय्यर आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. मधल्या फळीत नितीश राणा, रिंकू सिंह आणि मनदीप सिंह यांच्यावर जबाबदारी असणार आहे. त्यानंतर अष्टपैलू आंद्रे रसेल आणि सुनील नरिन संघाची जबाबदारी सांभाळतील. सुनील नरिन फलंदाजीबरोबरच अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. त्याला फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीची साथ मिळेल. याशिवाय शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि टीम साऊदी यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. यातला शार्दुल ठाकूर हा तळाला येऊन उपयुक्त फलंदाजी करण्यातही माहिर आहे.

धोनीची क्रेझ वाढतेय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. सलामीच्या लढतीतच अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा सामना युवा कर्णधार हार्दिक पांड्याशी होणार आहे. चेन्नईचा संघ आपल्या होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर हंगामाची तयारी करत आहे.


लीगमधील 10 संघांपैकी एक चेन्नई सुपर किंग्जचा चाहत्यांशी भावनिक बंध आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कर्णधार महेंद्रसिंग धोनी. 41 वर्षीय धोनीने संघाला चार विजेतेपद आणि नऊ फायनलपर्यंत नेले आहे, त्याची केवळ उपस्थिती विरोधी कॅम्पला घाबरवण्यासाठी पुरेशी आहे. धोनीचा क्रिकेटपटू म्हणून हा त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो आणि तो एक संस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही, म्हणूनच चिदंबरम स्टेडियमवर सराव जोरात सुरू आहे. त्यांचा थाला सराव पाहण्यासाठी चाहते मैदानावर येतात.

चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये धोनी हातात बॅट घेऊन क्रीजच्या दिशेने जात आहे. माहीला पाहताच स्टेडियम त्याच्या नावाने गुंजले. आयपीएल आता ‘होम अँड अवे’ फॉर्मेटमध्ये परतले आहे. चेन्नईला चेपॉकवर सात सामने खेळायचे आहेत. गेल्या मोसमात प्लेऑफ गाठण्यात अपयशी ठरलेल्या चेन्नई संघाचे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आले होते, मात्र नंतर धोनीला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले. आयपीएलमध्ये चेन्नईला हलक्यात घेणे मूर्खपणाचे ठरेल आणि यंदाचा हंगामही यापेक्षा वेगळा नाही. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आता संघात आहे जो एक्स फॅक्टर ठरू शकतो.

Exit mobile version