प्लॅस्टिक पिशव्या बंदीचा बोजवारा

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी परिसरात पातळ प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीचा बोजवारा उडाला आहे. मोहोपाडा बाजारपेठ, रिस व वावेघर बाजारपेठांत सर्रासपणे पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत संबंधितांकडून ठोस पावले उचलली जात नसून त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. शासनाने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जीआर काढून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा आदेश देण्यात आला. यावेळी वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलली. यावेळी दुकानदार, फेरीवाल्यांकडून पिशव्या जप्त करण्यात आल्या. गावात काहीकाळाने ही मोहीम थंडावली. यावेळी ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती. सद्यस्थितीला प्लॅस्टिक पिशव्यांच्या बंदीबाबत विसर पडला असून दुकानदार आणि फेरीवाल्यांना कोणाची भीती राहिलीच नसल्याचे दिसून येत आहे.

मोहोपाडा व आसपासच्या बाजारपेठेत पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर अनेकजण अशा पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. तसेच अनेकजण अशा पिशव्यांचा होलसेलचा वापर करीत आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांकडून ग्राहकांना पातळ पिशव्या दिल्या जात असून दुकानदारही मागे न राहता पिशव्या ठेवीत आहेत. त्यामुळे मोकळ्या जागेत, रस्त्यांच्या बाजूला नाल्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या निदर्शनास येत आहेत. प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारे तुंबण्याचे प्रकारही होत आहेत.

Exit mobile version