बांधपाडा पेयजल योजनेची चौकशी होणार

कोकण विभाग आयुक्तांचे आदेश
। उरण । वार्ताहर ।

तालुक्यातील खोपटे गावातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याबाबत मनसेचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत हे गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत असूनही अधिकारी वर्ग ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत सत्यवान भगत यांनी कोकण विभागीय उप आयुक्त नवी मुबंई यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामांत ठेकेदारांने घेतले काम आजतागायत पूर्णत्वास नेले नाहीत. यासंदर्भात मनसेचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी वारंवार तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने नाईलाजाने विभागीय आयुक्त कोकण भवन, नवी मुबंई यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. याची दखल घेऊन उप आयुक्त कोकण विभाग गिरीश भालेराव यांच्या सहीचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांना पत्र पाठवून सदर तक्रार अर्जातील नमूद मुद्यांच्या अनुषंगाने चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यास दोषींवर कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तक्रारदार भगत यांना देण्याचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version