वेब सीरिज बघून लुटली बँकेची तिजोरी

सिक्युरिटी व्यवस्थापकाचे कृत्य
। पनवेल । वार्ताहर ।
वेब सीरिज व चित्रपट बघून डोंबिवलीतील आयसीआयसीआय बँकेच्या संरक्षक व्यवस्थापकाला बँकेची तिजोरी लुटण्याचा मोह झाला. 11 वर्ष एकाच बँकेत काम करत असल्याने बँकेच्या तिजोरीसह सर्व हालचालींची बारकाईने माहिती असलेल्या तिजोरी संरक्षक व्यवस्थापनाने जुलैमध्ये बँकेच्या तिजोरीतील सुमारे 12 कोटीची रक्कम मोठ्या चलाखीने सहकार्यांच्या मदतीने लुटून नेली. बँकेच्या तपासणीत हा प्रकार उघड झाल्यानंतर तिजोरी संरक्षक व्यवस्थापक फरार झाला. अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर मानपाडा पोलिसांनी तिजोरी व्यवस्थापकाला पुण्यातून अटक केली.

अल्ताफ शेख (43) असे तिजोरी संरक्षक व्यवस्थापकाचे नाव आहे. त्याचे या प्रकरणातील सहकारी आरोपी अबरार कुरेशी (33), अहमद खान (33), अनुज गिरी (30) यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या चोरीचा म्होरक्या व्यवस्थापक शेख होता. चार महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. अल्ताफ शेखला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांवर, त्यांच्या खर्चावर पाळत ठेवली होती. अल्ताफला दरोडे, चोर्‍या, बँक लुटीच्या घटनांवर आधारित चित्रपट, वेब सिरिज पाहण्याची खूप हौस होती. या सततच्या पाहण्यातून त्याने आपण कार्यरत असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या डोंबिवली एमआयडीसीतील शाखेतून बँकेला कोणताही संशय येणार नाही अशा पध्दतीने बँकेच्या तिजोरीतून रक्कम लुटली.

11 वर्ष अल्ताफ बँकेच्या एमआयडीसीत शाखेत कार्यरत होता. बँकेचे कर्मचारी, अधिकारी, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही यांच्या हालचाली, येणेजाणे त्याला माहिती होते. बँक तिजोरी लुटण्याचा निर्णय घेतल्यानंतर अल्ताफने त्यानंतर लुटीची रक्कम कोठे ठेवायची. तिजोरी कशी फोडायची, ती रक्कम बँकेतून सीसीटीव्हीला चकवा देऊन कशी बाहेर काढायची, अशी योजना वेब सिरिजचा अभ्यास करुन तयार केली.

बँकेच्या सीसटीव्हीची दिशा बदलून, धोक्याचा इशारा देणारा भोंगा निष्क्रिय करुन एसीच्या एका बाजुला मोठे छिद्र पाडून त्यामधून तिजोरीतील 34 कोटी रक्कम बाहेर टाकण्याचा निर्णय घेतला. एवढी चोरी करुनही मी या प्रकरणात कोठेही नाही असे दाखविण्याचा अल्ताफचा प्रयत्न होता. दीड महिने बँकेची अंतर्गत पाहणी होणार नसल्याची खात्री पटल्यावर अल्ताफने हळूहळू रक्कम लुटीचा डाव रचला. परंतु बँक अधिकार्‍यांच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. तात्काळ वरिष्ठ आणि बँक पाहणी पथकाला बोलविण्याचा निर्णय बँकेने घेतला. आता आपण या प्रकरणात अडकले जाऊ या भीतीने तत्पूर्वीच तिजोरीतील 34 कोटीची रक्कम लुटीचा डाव त्याने रचला. त्याने एसीच्या छिद्र पाडलेल्या भागातून 34 कोटीची रक्कम भरुन ठेवली होती. ती रक्कम त्याने बँक इमारतीच्या पाठीमागील बाजूला लोटली. त्यावर ताडपत्री टाकली. या रक्कमेतील 12 कोटी घेऊन अल्ताफने आपल्या मित्रांसह पळ काढला.

या चोरी प्रकरणात अल्ताफच्या पत्नीने पोलिसांना पूर्ण सहकार्य केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रेय शिंदे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि शेखर बागडे, सुनिल तारमळे, प्रशांत वानखेडे, अशोक कोकोडे, सुशांत तांबे, संतोष वायकर, तारांचंद सोनवने यांच्या पथकाने केली.

Exit mobile version