पोटाची खळगी भरण्यासाठी शिडीचा आधार

आदिवासी बांधवांच्या नशिबी यातनामय जीवन
शासनाकडून दुर्लक्ष, अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत

। माथेरान । वार्ताहर ।

गावापासून छोट्या वाटेने दोन ते तीन तासांचा प्रवास, प्रचंड उभा चढाव, त्यातच अगदी पाय बसेल एवढीच पाऊलवाट आणि पुढे-पुढे अश्यक्यप्राय अशा पस्तीस ते चाळीस फूट उंचीच्या लाकडी शिड्या चढायच्या, हे सर्व करत असताना, आजूबाजूला खोल दरी, असा जीवघेणा प्रवास करत येथील आदिवासी बांधव वर्षानुवर्षे मोलमजुरीसाठी माथेरान गाठत आहेत. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी, परंतु वास्तव कथा असून, येथील आदिवासींच्या नशिबी यातनामय जीवन आहे. परंतु, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून, अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.


रायगड जिल्ह्यातील जगप्रसिद्ध थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान. याच माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या अनेक आदिवासी वाड्यांवर जाण्यासाठी चांगल्या स्थितीत रस्ते नाहीत. यातील बहुतेक आदिवासी वाड्यातील बांधव आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी माथेरानला नियमितपणे येत असतात. कुणी मोलमजुरी, तर कुणी भाजीपाला, मासे प्रत्येक ऋतूप्रमाणे माल विक्रीसाठी घेऊन येत असतात. काहींची मुले इथे दहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायपीट करून हे उभे डोंगर चढून वर येत असतात. वरोसा, उंबरवाडी, पिरकटवाडी या तीन वाड्यांचा खोंडा नावाने प्रसिद्ध असलेले आदिवासी गाव हे आपल्या उपजीविकेसाठी मोलमजुरी कामासाठी माथेरानलाच यावे लागते. उन्हाळा असो पावसाळा असो ही मंडळी आपला जीव मुठीत घेऊन आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी येत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे लोटली असताना, आजही अनेक भागातील आदिवासी समाज मूलभूत सेवासुविधांपासून वंचित आहे. या डोंगर दर्‍यांमध्ये पिढ्यान्पिढ्या वास्तव्यात असणार्‍या आदिवासींच्या मूलभूत प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

माथेरान गुजरात भवन हॉटेलचे मालक उमेश दुबल मित्र परिवाराने त्यांच्या दोन लोखंडी शिड्या बनवून दिल्या. परंतु, आदिवासी बांधवांना काही काळच त्यांचा उपयोग करता आला. कारण, 26 जुलै 2019 च्या प्रचंड पावसामुळे त्या भागातील डेंजरपाथ पॉईंटवरील मोठाली दरड व माती वाहून गेल्यामुळे त्याच्या जोरदार प्रवाहामुळे संपूर्ण भागच नष्ट झाला. नवी शिडीदेखील वाहून गेली. पायवाट सुद्धा राहिली नाही. शेवटी श्रमदानातून येण्या-जाण्यासाठी एक लाकडी शिडी पायवाट करण्यात आली आहे. आणि याच पायवाटेने, लाकडी शिडीने अजूनही आदिवासी लोक येथून ये-जा करीत आहेत. याकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, व तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

आम्हाला पोटापाण्यासाठी, कामधंदा इतर गोष्टीसाठी माथेरानला यावे लागते. आमचे जीवन माथेरानवरच अवलंबून आहे. तरी आम्हाला येण्या-जाण्यासाठी लोखंडी शिडी कोणीतरी दानशूर व्यक्तीने पुढे येऊन बसवून द्यावी, ही आमची कळकळीची विनंती आहे.

राजू उघडे, देहू पारधी, आदिवासी ग्रामस्थ
Exit mobile version