। सुधागड -पाली । वार्ताहर ।
घरगुती सिलेंडरचे दर हजार रुपयांवर पोहचले आहेत. त्यातच शासनाने रॉकेल पुरवठा देखील बंद केला आहे. यामुळे जिल्ह्यात निमशहरी व ग्रामीण भागातील चुलीचा थोडा आधार आहे. मात्र लाकूड फाटा देखील महागल्यामुळे चूल देखील कशी पेटवणार आणि जेवण सुद्धा शिजवायचे कशावर असा प्रश्न महिलांना पडला आहे. मागील वर्षी शंभर रुपयांना मिळणारी लाकडाची एक मोळी आता 200 ते 150 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे एकूणच इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य व ग्रामीण भागातील लोकांचे जगणे मुस्किल झाले आहे.
सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ते सर्वसामान्यांना देखील परवडेनासे झाले आहेत. ग्रामीण भागात आणि आदिवासी वाड्यापाड्यांवर तर आणखी गंभीर परिस्थिती आहेत. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद दिल्ली संलग्न चे कोकण संघटक व सुधागड तालुक्यातील आदिवासी नेते रमेश पवार यांनी सांगितले की गॅस घेणे गरीब व हातावर पोट असलेल्यांना शक्य नाही. उज्वला योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी देखील गॅस सिलेंडर घ्यायला पैसे नसल्याने आता चुलीवर अन्न शिजवीत आहेत. कोरोना महामारी अनेकांचा रोजगार हिरावला आहे आणि इंधन भावाढीमुळे लोकांच्या खाण्याचे वांदे झाले आहेत असे रमेश पवार यांनी सांगितले. सिलेंडर वरील सबसिडी बंद झाल्याने ग्राहकांवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे सिलेंडर घेणे परवडत नाही.
काही ठिकाणी रेशनवर मिळणारे रॉकेल बंद असल्याने लोकांची खूप गैरसोय होत आहे. रॉकेलचा काळाबाजार होतांना दिसत आहे. काही ठिकाणी रॉकेल तब्बल 70 ते 80 रुपये लीटरने मिळत आहे. मग एवढ्या चढ्या भावात खरेदी करणे सर्वमान्य नागरिक व ग्रामीण भागातील लोकांना परवडत नाही. त्यामुळे शासनाप्रती त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे.
लाकूडफाट्यासाठी वणवण
सिलेंडर महागले, रॉकेल मिळत नाही, लाकूडफाट्यासाठी रानात उन्हाची वणवण करावी लागते. तो सुद्धा मुबलक मिळत नाही. आणि विकत घेणे परवडत नाही. शासनाने गोरगरिबांचा विचार केला पाहिजे. असे सुधागड तालुक्यातील लक्ष्मी वाघमारे या महिलेने सांगितले. रेशनवर गहू तांदूळ भेटतात पण जेवण बनवायचे कशावर हा प्रश्न आहे. रॉकेल बंद झाले आहे. एवढा महाग गॅस सिलेंडर घेणार कसा? त्यामुळे खूप जगणं मुस्किल झाले आहे. असे ताई पवार या महिलेने डोळ्याच्या कडा पुसत सांगितले.
उज्वला योजनेमुळे शासनाने गॅस कनेक्शन संख्येत वाढ झाल्याने सरकारने गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांचा रॉकेल पुरवठा बंद केला आहे.
मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी