शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय
| चिरनेर | प्रतिनिधी |
एमएमआरडीएच्या प्रस्तावित तिसर्या मुंबई विरोधात महामुंबई सेझ प्रमाणेच विरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्णय रविवारी शेतकर्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
उरण, पनवेल पेण 124 महसुली हद्दीतील गाव क्षेत्रात एमएमआरडीएने तिसरी मुंबई उभारण्याचा घाट घातला आहे. या प्रस्तावित तिसरी मुंबई उभारण्यासाठी शासनाने येथील शेतकर्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही. जमीनी देणार की नाही याबाबत शेतकर्यांशी चर्चा, विचारविनिमयही केलेला नाही. असे असतानाही शेतकर्यांना अंधारात ठेवून शासनाने भूसंपादनाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. या विरोधात निषेध, संताप व्यक्त करीत 25 हजारांहून अधिक शेतकर्यांनी हरकती नोंदविल्या आहेत.
आता तिसर्या मुंबई विरोधात शेतकर्यांनी लढ्याची रुपरेषा ठरवण्यासाठी रविवारी (दि.15) एमएमआरडीए विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. पाणदिवे येथील हुतात्मा पुंडलीक रामा पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संघर्ष समितीचे समन्वयक रुपेश पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सत्यवान ठाकूर आणि विविध संस्थांचे सुमारे 45 सदस्य सहभागी झाले होते. या बैठकीत प्रस्तावित तिसर्या मुंबईला कायमच विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. बलाढ्य मुकेश अंबानी यांच्या महामुंबई सेझला शेतकर्यांनी परतुन लावले होते. त्याच प्रमाणे तिसर्या मुंबईच्या निर्मिती विरोधात आरपारची लढाई छेडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संघर्ष करण्यासाठी नव्याने पदाधिकार्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी शनिवार (दि.21) रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. अशी माहिती उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली.