प्रारूप प्रभाग रचना होणार जाहीर
| रायगड | प्रतिनिधी |
गेल्या तीन वर्षापासून अधिक काळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पहिले पाऊल सोमवारी टाकले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभा रचनांचा प्रारून आराखडा उद्या (दि.14) रोजी जाहीर होणार आहे. हा प्रारूप आराखडा जिल्हाधिकारी कार्यालय, 15 तहसील कार्यालय, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या कार्यालयात व राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे.
प्रसिध्द करण्यात येणारा आराखडा हा प्रारूप आराखडा असून, त्यावर आयोगाच्या वेळापत्रानूसार हरकती घेण्यात येवून 18 ऑगस्टला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी अंतिम आराखडा प्रसिध्द होणार आहे. दरम्यान, अनेक तालुक्यात शहरी भाग हा नगर पालिका अथवा नगर परिषदांना जोडला गेला असल्याने प्रारूप प्रभाग रचनेत आपली हक्काची गावे राहणार की नाहीत, या चिंतेत इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसार राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनानूसार ग्रामीण भागातील महत्वाच्या असणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्याच्या निवडणुकीसाठी पूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे.
यात सर्व प्रथम जिल्हा गट आणि गणाची प्रभाग रचना (प्रारूप आणि अंतिम) जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर नव्याने आरक्षणाची प्रक्रिया राबवण्यात येणार असून 2022 च्या जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमातील दुरूस्तीनूसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे जास्ती जास्त 75 तर कमीत कमी 50 गट राहणार आहे. त्यात्या ठिकाणी असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे गट निश्चित करण्यात येणार आहेत.
गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून रायगड जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. गत 2017 च्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेचे 62 गट तर पंचायत समित्यांसाठी 124 गण होते. दरम्यान रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये पनवेल नगरपालिकेची महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे गट कमी झाले. 62 गटांची संख्या 59 गटांवर आली होती. ठाकरे सरकारच्या काळात वाढीव लोकसंख्या गृहीत धरून गटांची संख्या वाढविण्यात येणार होते. परंतु, राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर ठाकरे सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानेही गत निवडणुकीप्रमाणेच निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
गट, गण रचनेकडे लक्ष
जिल्ह्यात उद्या जाहीर होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रचनेत बदल होणार की नाही. अनेक ठिकाणी शहरीकरण झालेले असून यामुळे काही तालुक्यात गट आणि गणांची रचना बदलणार असून याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. प्रारूप रचना प्रसिध्द झाल्यानंतर ती मान्य नसल्यास त्यावर हरकतींची प्रक्रिया सुरू होणार आहे.
प्रभाग रचना कार्यक्रम
14 जुलैला प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध होणार
21 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करणे
28 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करणे
11 ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय घेणे
18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करणे.





