म.वि.आ 30 ते 35 जागांवर विजयाचा दावा
| पुणे | प्रतिनिधी |
”बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. अर्थात आमच्यासाठी सर्व 48 जागा महत्त्वाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला 30 ते 35 जागांवर विजय मिळेल”, असा दावा शिवसेनेचे संजय राऊत यांनी केला.
पुण्यातील उंड्री येथे रविवारी (दि.28) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहराध्यक्ष संजय मोरे, माजी आ. महादेव बाबर आदी या वेळी उपस्थित होते. राऊत म्हणाले, ”महायुतीला मुंबईत दोन ठिकाणी तसेच, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नाशिक मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत. महायुतीला महाराष्ट्रात जिंकण्याची खात्री असेल तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धमक्या का देत आहेत? बारामती, शिरूर मतदारसंघात लोकांना मताधिक्य न दिल्यास बघून घेईन, अशा धमक्या अजित पवार यांच्याकडून दिल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. ”व्यापारी, उद्योजकांना नोटीस पाठवून दंड आकारण्याची धमकी दिली जात आहे. आर्थिक हितसंबंध असलेले काहीजण धमक्यांना भीक घालतील पण जनता जुमानणार नाही. अनेक वर्षे आपण मंत्री आहात, ही भाषा तुम्हाला शोभते का? बारामतीमध्ये तळ ठोका, तंबू ठोका. काही होणार नाही. चार जूनला सरकार बदलले दिसेल,” अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली. सध्या महायुतीकडून ज्या पद्धतीने राजकारण केले जात आहे, ते महाराष्ट्राला पटलेले नाही. नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाबाबत वक्तव्य केले होते. याबाबत राऊत म्हणाले, ”मोदी यांना गांभीर्याने घेवू नका. देशात 2014 मध्ये मोदी यांच्याबाबत जी लोकभावना आणि प्रेम होते. ते सध्या राहुल गांधी यांच्याबाबत पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांना देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे.”