प्रेम व द्वेषाची लढाई

उत्तर प्रदेशातील मुजफ्फराबाद येथे नुकतीच पार पडलेल्या शेतकरी महापंचायत मेळाव्याला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला ते पाहता उत्तर प्रदेश मध्ये येत्या पाचेक महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका सोप्या तर जाणार नाहीतच, पण त्या एका नव्या समीकरणातून लढल्या जातील हे स्पष्ट आहे. मेळाव्यात जे समीकरण दिसले, त्यातून द्वेष आणि प्रेम या दोन शक्तींचा संघर्ष या विधानसभा निवडणुकीनंतरच्या काळातही दिसणार आहे, हेही स्पष्ट झाले आहे. शेतकरी बांधव गेले असंख्य महिने देशात आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या अन्यायकारक तीन कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी करत आहेत. केंद्र सरकारने शेतकर्‍यांशी प्रारंभी चर्चा केली खरी, मात्र 22 जानेवारी नंतर अद्याप एकदाही चर्चेचा प्रस्ताव मांडलेला नाही की या आंदोलनात जे सहाशे पेक्षा अधिक शेतकरी मृत्यूमुखी पडले त्याबद्दल दुःख देखील व्यक्त केले नाही. त्यामुळे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे सर्वांनाच दिसले. आता ही महापंचायत जेथे झाली त्याची पार्श्‍वभूमी पाहू. 2013 मध्ये उत्तर प्रदेशच्या या मुजफ्फराबाद येथे अत्यंत भीषण दंगल या देशाने पाहिली. ही सत्ताबदलापूर्वीची द्वेषमूलक मांडणी होती. स्थानिक भाजपा आमदाराने खोट्या व्हिडिओद्वारे मुसलमानांकडून हिंदूंवर कसे अत्याचार केले जात आहेत हे पसरवले आणि खोट्याचे खरे करण्यात माहीर असलेल्या भारतीय जनता पार्टीने तो वणवा पसरवला आणि त्याचा फायदा त्यांना राजकीय लाभाद्वारे मिळाला. त्यामुळे ही महापंचायत या ठिकाणी दंगलीनंतर आठ वर्षानंतर होत असताना तेथील दंगलीच्या जखमा बुजत आलेल्या दिसल्या आहेत, त्याचबरोबर ज्यांनी समाजामध्ये फूट पाडली, दोन समुदायात द्वेष निर्माण केला, त्यांनी तसे करून कोणते लाभ उठवले आणि आज ते जनतेला त्याची कशी परतफेड करीत आहेत, हेही सगळ्यांना उमजून चुकले आहे. त्यामुळे तेव्हा ‘हर हर महादेव’ आणि ‘अल्ला हो अकबर’ या दोन्ही घोषणा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी चालल्या आणि एकमेकांच्या विरोधात चालल्या; मात्र यावेळी या दोन्ही घोषणा एकत्रितपणे दिल्या गेल्या. त्याद्वारे आता आपण एक होऊन या अन्यायकारक शक्तींशी आणि असंवेदनशील सरकारच्या विरोधात आंदोलन तीव्र करण्याचे निश्‍चित केले. आतापर्यंत विद्वेषातून राजकीय पोळी कशी भाजली जाते, याचा आपला इतिहास मोठा आहे. बाबरी मशिदीचा विध्वंस असो वा राम मंदिर उभारण्यासाठी ऐंशी, नव्वदच्या दशकांत झालेली मोहिम असो, त्यात हजारो लोकांचे प्राण गेले आहेत आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झालेला आहे. त्यामुळे त्यांचा भर हा नेहमी विद्वेषावरच असतो. दोन्ही जमाती एकमेकांच्या विरोधात, त्याच विषयात गुरफटून राहिलेले त्यांना हवे असते. कारण ते जर त्यातून बाहेर आले, तर ते शेतीमालाच्या योग्य किमती मागतील; जगण्याचा न्याय्य हक्क मागतील; पोटासाठी अन्न आणि रोजगार मागतील, हे त्यांना नीट माहिती आहे. ते काही आपण देऊ शकत नाही, हेही त्यांना नीट माहिती आहे. म्हणूनच त्यांना हा विद्वेष पेटता ठेवायचा आहे. नेमक्या त्याच्याच विरोधात शेतकरी उभा राहिलेला आहे आणि त्यांनी यावेळी द्वेष मिटवून ही लढाई एकत्रितपणे लढण्याची तयारी केलेली आहे. शेतकर्‍यांचे आता वेगवेगळ्या ठिकाणी मिळावे मोर्चे सुरू आहेत आणि निवडणुका होईपर्यंत असे मिळावे चालूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केवळ मतपेट्या दिसणार्‍या भाजपला त्याच वोट पे चोट देऊन त्यांना नामोहरम करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. ही गोष्ट भाजपाला तितकी पचणारी नाही, उलट धास्तावणारीच आहे. कारण अपेक्षेपेक्षा दुपटीने शेतकरी तेथे जमले होते. त्यामुळेच स्थानिक भाजप खासदार यांनी शेतकरी संघटना ही देशाच्या शत्रूंच्या हातचे खेळणे बनल्याचे म्हटले आहे. म्हणजे लांबच्या शत्रूकडे बोट दाखवायचे आणि त्या दिशेने पाहात असताना तुमच्या खिशातले पाकीट मारायचे, असा प्रकार हे सरकार करीत आहे. त्यामुळेच ते आता वेगवेगळ्या विषयात लोकांना गुंतवून रस्त्यापासून रेल्वेपर्यंत सर्व सरकारी संपत्ती खाजगी उद्योजकांच्या घशात घालत आहे. खरे तर हेच सरकार काही भांडवलदारांच्या हातचे खेळणे बनले आहे आणि ही फार देश म्हणून लज्जास्पद गोष्ट आहे. त्यामुळे या लढाईत द्वेषाचा पराभव व्हायलाच हवा आणि तो होईल.

Exit mobile version