नाताळच्या सुट्टीचा घेतला मनमुरादपणे आनंद
। अलिबाग । प्रतिनिधी ।
नाताळच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटक दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील अलिबागसह किहीम, वरसोली, काशिद अशा अनेक समुद्रकिनार्यांमध्ये फिरण्याचा, पाण्याचा पोहण्याचा व सागरी सफरीचा आनंद पर्यटकांनी मनमुरादपणे घेतला. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला होता.
अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, किहीम, काशीद, मुरुड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. नाताळच्या सुट्टीनिमित्त पर्यटक जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने दाखल झाल्याने हॉटेल, रिसॉर्ट, कॉटेज, लॉजींग, पर्यटनावर आधारित असणार्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची चंगळ झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये स्थानिकांना रोजगाराचे साधन खुले झाले. सकाळपासून जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनार्यांमध्ये पर्यटकांची गर्दी दिसून आली. काही पर्यटकांनी समुद्रातील पाण्यात पोहण्याबरोबरच बनाना व इतर सागरी सफरीचा आनंद घेतला. काही पर्यटकांनी घोडागाडी, सायकलवर स्वार होऊन समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटला.
नाताळच्या सुट्टीनिमित्त काही पर्यटक मंगळवारी सायंकाळी अलिबागसह अन्य पर्यटनस्थळी दाखल झाले होते. काही पर्यटक बुधवारी सकाळीच आले होते. काही पर्यटकांनी दिवसभर सुट्टीचा आनंद लुटत सायंकाळी परतीचा मार्ग स्वीकारला. पर्यटकांना त्यांच्या निश्चित स्थळी वेळेवर पोहोचता यावे, यासाठी अलिबाग एसटी बस आगारातून नियमित बसेसबरोबरच अलिबाग-पनवेल विना थांबा ज्यादा बसेस सोडण्याचे नियोजन केले. दुपारपासून अलिबाग स्थानकात पर्यटकांची अफाट गर्दी दिसून आली. पनवेलपर्यंत जाण्याचे तिकीट काढण्यासाठी स्थानकात रांगच रांग लागली होती.
जलवाहतुकीला अल्प प्रतिसाद
रस्त्यावर होणार्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांनी जलमार्गाला पसंती दर्शविली असली तरी अपेक्षित गर्दी नव्हती. पीएनपी, अंजठा, मालदार आदी जलसेवेतून पर्यटक मुंबईकडे रवाना होत होते. परंतु, मध्यंतरी घडलेली बोट दुर्घटना त्याचबरोबर मधला वार असल्याने जलमार्गाने प्रवासाला अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.
