सीगलच्या आगमनाने पर्यटक आनंदी
| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
राज्यात मनमोहक असणाऱ्या कोकण किनारपट्टीवर सीगल पक्षी अवतरले असून या पाहुण्यांनी जिल्ह्यातील किनारपट्टीलगत असलेले देवबाग, मालवण, भोगवे, दांडी-मालवण समुद्रकिनारे गजबजले आहेत. देवबाग किनाऱ्यावर तर रपेट मारताना सीगल पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसू लागल्याने पर्यटकांच्या आनंदाला पारावार उरत नाही. सीगलचे हे लक्षवेधी तितकेच नेत्रदीपक दृश्य पाहून पर्यटक भारावून जात आहेत.
1 सप्टेंबरपासून कोकणातील पर्यटन हंगाम सुरू होतो; मात्र दिवाळीला मुलांना शाळेत सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची संख्या दिवाळीत अधिक वाढते, ती संख्या पुढे कमी-अधिक प्रमाणात वाढतच राहते. नोव्हेंबरअखेर थंडीला सुरुवात झाल्यानंतर परदेशातील विविध पक्षी किनारपट्टीवर हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात. या पक्ष्यांचे थवे लक्षवेधी तर असतातच पण त्या थव्याचे चित्र डोळ्याचे पारणे फेडणारे असेच असते; त्यामुळे कोकण किनारपट्टीवर अनेक पर्यटक प्रतिवर्षी आवर्जून उपस्थिती दर्शवितात. सद्यःस्थितीत हजार किलोमीटरवरून सीगल पक्षी हजारोंच्या संख्येने किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. या पक्ष्यांचे थवे डोळ्याचे पारणे फेडण्यासारखे असेच आहे, त्यामुळे व्यावसायिकांना काहीसे सुगीचे दिवस आले आहेत. आता तर डिसेंबर महिन्याची सुरुवात असून, पर्यटकांची संख्यादेखील वाढू लागली आहे. याला कारण म्हणजे गोवा राज्यातील गजबजलेल्या किनारपट्टीला पर्याय ठरणारे असे स्वच्छ, सुंदर किनारे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांना उपलब्ध आहेत. हे स्वच्छ, सुंदर किनारे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. याच स्वच्छ, सुंदर किनारपट्टीमुळे अलीकडे गेल्या काही वर्षात प्री वेडिंगसारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत.
सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील भोगवे गावाला निसर्गाचे चांगले वरदान लाभलेले आहे. या ठिकाणचे स्वच्छ सुंदर वातावरण आलेल्या प्रत्येक पर्यटकाला भुरळ घालते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात याठिकाणची सर्व पर्यटन स्थळे हाऊसफुल्ल असतात. एकूणच सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचा आनंद व्यक्त करण्यासाठी पर्यटक आवर्जून वेंगुर्ले-भोगवे येथे उपस्थित राहतात, त्यामुळे आमची हॉटेल्स सुध्दा 2-3 महिने बुकिंग असतात, असे भोगवे येथील व्यसायिक महेश सामंत यांनी सांगितले.
प्रति वर्षाच्या तुलनेत यावर्षी कोकणात निवडणुकांमुळे पर्यटन हंगामावर काहीसा परिणाम झाला, तरीसुद्धा आता डिसेंबर महिना सुरू झाला असल्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 15 डिसेंबरपासून मालवणमधील बहुतांश हॉटेल बुक आहेत. राजकोट किल्ल्यामुळे तर अनेक पर्यटकांची मालवण तालुक्यात पावले वळू लागली आहे; मात्र राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळ्याच्या झालेल्या दुर्घटनेमुळे सद्यःस्थितीत तो भाग पोलिसांच्या छावणीत आहे. शासनाने तो भाग पर्यटकांसाठी खुला केल्यास पर्यटकांना राजकोटचा परिसर पाहता येईल, असे मत पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी व्यक्त केले आहे.