| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
शालेय परीक्षा संपल्याने पर्यटनाचा हंगाम खर्या अर्थाने सुरू झाल्याचे दिसून येत असून, मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेले दिसत आहेत. शनिवारी काशीद, मुरूड, नांदगाव आदी समुद्रकिनार्यावर पर्यटकांची मोठी मांदियाळी दिसून आली.
जंजिरा किल्ला, पद्मजलदुर्ग, आंबोली धरण, फणसाड अभयारण्य, नांदगाव येथील श्री सिध्दीविनायक देवस्थान, मुरूडचे दत्त देवस्थान, खोरा जेट्टी बंदर, आगरदांडा जेट्टी, डोंगरी सनसेट पॉईंट, मुरूड नगरपरिषदेने विकसित केलेली उद्याने, मुरूड ग्रामदेवता कोटेश्वरी देवीचे देवस्थान आदी ठिकाणी पर्यटक भेटी देताना दिसून आले. मुरूडचे तापमान 37 ते 38 असून, शनिवारी सायंकाळी मुरूड समुद्रकिनार्यावर शेकडो पर्यटक उतरलेले दिसून येत होते. समुद्रात पोहण्याचा मनसोक्त आनंद पर्यटकांनी लुटला. उपलब्ध तीन चाकी, घोडागाडी सवारी, घोड्यावर स्वार होऊन रपेटचा आनंद अनेक पर्यटक घेताना दिसत होते.
अनेक पर्यटकांनी मुरूड बाजारपेठेत जाऊन सफेद कांदे, ओल्या काजू बिया, गावठी भाज्या केल्या. मासळी कमी प्रमाणात असल्याने सुकी मासळी खरेदीकडे मोर्चा वळविला होता. काशीद, मुरूड, नांदगाव परिसरात लॉजिंग व्यवस्था फुल्ल दिसत होती. मुरूड समुद्रकिनारी वाळूवरील पार्किंगवर मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने पार्क करण्यात आली आहेत. हॉटेलिंग, संबंधित व्यावसायिक यांनादेखील सुगीचे दिवस आले असून यापुढे पर्यटकांची वर्दळ वाढती राहील असे अनुमान अनेकांनी व्यक्त केले. जंजिरा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होती. गोवा जाण्यापेक्षा कोकणातील किनारे आम्हाला फार आवडू लागल्याच्या प्रतिक्रिया अनेक पर्यटकांनी दिल्या.