| मुंबई | प्रतिनिधी |
दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसरातील डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, रुदरफोर्ड मार्ग आणि बी. भरूचा मार्ग येथे सुरू असलेले सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. सुशोभीकरणानंतर मुंबईकरांसह, देश-विदेशातील पर्यटकांसाठी हा परिसर खुला करण्यात येणार आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांचा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, माजी मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन गुरुवारी (दि.11) सकाळी आढावा घेतला. सहायक आयुक्त (ए विभाग) जयदीप मोरे, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा परिसराची ओळख आहे. नागरिक, पर्यटकांची या भागात नेहमीच वर्दळ असते. येथे संग्रहालये, कला दालने आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती आहेत. या परिसरात फेरफटका मारताना, खरेदी करताना, चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतांना पर्यटकांना इतर सुविधाही पुरविण्यासाठी महानगरपालिकेने सुशोभीकरणाची कामे हातात घेतली आहे. परिसरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. या परिसराच्या चारही बाजूंना अद्ययावत बॅरिकेटस् लावण्यात येणार आहेत. बी. भरूचा मार्गावरील चौकात ‘प्लाझा’ साकारण्यात येणार आहे. या प्लाझाजवळ टेबल-खुर्चीवर बसून मुंबईकर, पर्यटक या परिसराचा, येथील स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेऊ शकणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांचा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी तथा प्रशासक यांनी आढावा घेतला. हा परिसर अधिकाधिक सुंदर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच या ठिकाणचे प्रत्येक उपहारगृह, भोजनालय दालने पाट्या या एकसारख्या आकाराच्या आणि नियमात असायला हव्यात, अशा सूचना गगराणी यांनी दिल्या.







