सीआरझेडमुळे मुरुड समुद्रकिनार्‍याचे सुशोभिकरण रखडले

। मुरुड । वार्ताहर ।
मुरुड समुद्रकिनार्‍याचे सुशोभिकरण सीआरझेडमुळे रखडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुरुड जंजिरा समुद्रकिनार्‍याच्या सुशोभिकरणा प्रस्ताव साडेअकरा कोटींचा असून त्यामध्ये 200 गाड्यांची पार्किंग व पर्यटकांना बसण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था करण्याचे अंदापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यासाठी मेरीटाईम बोर्डासह अन्य विभागाच्या रितसर परवानग्याही मिळालेल्या आहेत. पण समुद्रालगत सुशोभिकऱण होणार असल्याने गेल्या दोन वर्षांपासून सीआरझेड विभागाची परवानगीच मिळाली नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सीआरझेड कमिटीची सभा होतच नसल्याने सुशोभिकरणाची परवानगी रखडल्याचे समोर आले आहे.

या कमिटीमध्ये राज्याचे प्रधान सचिव व नेमक्याच आमदारांचा समावेश आहे. मात्र या समितीची बैठकच होत नसल्याने अनेक विकासकामे रखडली आहेत. यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधींनी एकजुटी दाखविणे गरजेचे आहे. उपलब्ध माहितीनुसार सीआरझेड समितीची बैठक वेळोवेळी पुढे ढकलली जाते. ऑनलाईन बैठकीत एका जिल्ह्याला 2 मिनिटे दिली जातात. त्यावेळी योग्य माहिती न मिळाल्यास परवानगी पुढच्या सभेत जाते. त्यामुळे ही कामेे रखडली जातात.

मुरुड समुद्रकिनार्‍याचे सुशोभिकरण झाल्यास पर्यटकांची संख्या वाढेल. यासाठीचा प्रस्ताव मंजूर होऊन त्याला निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे. मेरीटाईम बोर्डाच्या परवानग्या मिळाल्या आहेत. सध्या हा प्रस्ताव सीआरझेडच्या परवानगीसाठी पाठवला आहे. परवानगी मिळताच काम सुरु होईल.

– पंकज भुसे, मुख्याधिकारी

समुद्र किनारा सुशोभिकरणाच्या कामाला सीआरझेडची मान्यता मिळण्यासाठी दोन वर्ष थांबायला लागणे म्हणजे शासनाच्या यंत्रणेत दोष असल्याने नमूद होते. विकासाचा अतिशय महत्वाचा टप्पा दुर्लक्षित होत आहे. यावर आमदारांनी व लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात लक्षवेधी मांडून कामाला गती देणे गरजेचे आहे.

– अरविंद गायकर, समाजसेवक
Exit mobile version