। रायगड । प्रतिनिधी ।
आज आपल्या सर्वांच्या साक्षीने एका वेगळ्या विकास पर्वाची सुरुवात आम्ही करीत आहोत. प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या अध्यादेशानुसार आम्ही सर्वजण प्रशासनासोबत चांगला मेळ साधून अलिबाग शहराचा विकास करु, अशी ग्वाही नवनिर्वाचित नगरसेविका ॲड. मानसी म्हात्रे यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, एका नव्या पर्वाची सुरुवात होतेय याची चाहूल शहराला लागली आहे. आणि शहराने ते पर्व स्वीकारुनच भरभरुन मतांनी थेट नगराध्यक्ष अक्षया नाईक यांना निवडून दिले आहे. एक वेगळी दिशा शहराला त्यांच्या रुपाने मिळणार आहे. विशेषतः तरुणांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अक्षया नाईक या आज या सभागृहात विराजमान झालेल्या आहेत. याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. मी निश्चितपणे खात्री देऊ इच्छिते की, एक तरुण चेहरा नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झालेला आहे. परंतु, अवतीभोवती नवे-जुने चेहरे नगरसेवकांच्या रुपाने आम्ही आहेत. आमच्या अनुभवातून शहराचा विकास निश्चितच केला जाईल. प्रशांत नाईक यांनी गेली 30 ते 35 वर्षे या शहराचे नेतृत्व केले आहे, त्यांच्या विकासाचा वेग आज संपूर्ण शहराला माहिती आहे. त्यांच्या टीममध्ये आम्ही बरीचशी लोक असून, त्यांच्याबरोबर काम करणारे आम्ही आहोत, असेही ॲड. म्हात्रे म्हणाल्या.
विकासपर्वाची सुरुवात : ॲड. मानसी म्हात्रे
